मी नास्तिक आहे, हे सांगण्याचं धाडस भलेभले..; विद्यानंद बापट यांच्याविषयी अमोल पालेकर स्पष्टच बोलले
ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी विद्यानंद बापट यांचं सर्वांसमोर कौतुक केलं. ध्वनी प्रदूषण आणि डीजेचा दणदणाट यावर विद्यानंद बापट हे सातत्याने आपली भूमिका मांडत आहेत.

Vidyanand Bapat: पुण्याच्या गणेशोत्सवातील डीजे आणि कर्णकर्कश ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा यंदा चांगलाच चर्चेत आला. या प्रश्नावर सातत्याने भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांचा ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पालेकर यांनी बापट यांच्या भूमिकेचं कौतुक करत नागरिकांनी आपल्या हक्कांसोबतच जबाबदाऱ्यांचीही जाणीव ठेवणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. गणेशोत्सवातील मोठ्या आवाजातील डीजे, लाऊडस्पीकर आणि मिरवणुकांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत विद्यानंद बापट यांनी पुण्यातील बैठकींमध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. गणेशोत्सवाला किंवा धार्मिक उत्सवांना विरोध नसून, उत्सव साजरा करताना इतर नागरिकांना होणारा त्रास टाळला पाहिजे, असा त्यांचा मुद्दा आहे. विशेषतः ध्वनी प्रदूषण आणि वाहतुकीला होणारा अडथळा हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
अमोल पालेकर यांनी याच भूमिकेचा संदर्भ देत बापट यांचं कौतुक केलं. गणेशोत्सवासारख्या धार्मिक वातावरणात नास्तिकतेची भूमिका मांडणं आणि त्याचवेळी ध्वनी प्रदूषणासारख्या नागरी प्रश्नावर आवाज उठवणं हे धाडसाचं काम असल्याचं पालेकर यांनी नमूद केलं. “भर गणेशोत्सव तोंडावर असताना मी नास्तिक आहे, हे सांगण्याचं धाडस भलेभले करणार नाहीत. नास्तिकांच्या भूमिकेला समजून न घेणारी मंडळी, नास्तिक म्हणजे अश्रद्ध असं सोपं समीकरण करतात. विद्यानंद त्यालाही थेट छेद देतो. तो नास्तिक असूनही बहुतांश सर्वसामान्य पुणेकर त्याच्या मागे उभ राहिले, हे पण विशेषच म्हणावं लागेल,” असं पालेकर म्हणाले. बापट यांनी लोकहिताचा मुद्दा मांडताना त्यावर तार्किक पद्धतीने चर्चा केली, असंही त्यांनी सांगितलं. विद्यानंद बापट यांनी आपल्या भाषणात पुण्यातील उत्सवांच्या इतिहासाचा संदर्भ घेतला. लाऊडस्पीकर किंवा आधुनिक ध्वनिवर्धक यंत्रे ही पारंपरिक उत्सवांचा सुरुवातीपासूनचा भाग नव्हती, असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यामुळे उत्सवाची परंपरा कायम ठेवताना काळानुसार काही बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
पुण्याच्या जुन्या पेठांमधील अरुंद रस्ते आणि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मिरवणुका यामुळे वाहतुकीचा प्रश्नही निर्माण होतो, असं बापट यांनी यापूर्वी सांगितलं होतं. उत्सव साजरा करण्याचा अधिकार आणि इतर नागरिकांच्या सोयीचा विचार करण्याची जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र पाहायला हव्यात, अशी त्यांची भूमिका आहे. अमोल पालेकर यांनी बापट यांच्या भूमिकेचा विस्तार करत नागरिकांनी केवळ स्वतःच्या हक्कांपुरता विचार न करता सार्वजनिक प्रश्नांवर सक्रियपणे भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं. ध्वनी प्रदूषणाबरोबरच वाहतूक, सार्वजनिक जागांचा वापर आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांनी प्रश्न विचारणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. एका व्यक्तीचा आवाज कदाचित कुजबुज वाटेल, पण अशा अनेक आवाजांची मिळून एक दिवस मोठी गर्जना बनते, असंही वक्तव्य अमोल पालेकर यांनी केलं.
दरम्यान, बापट यांच्या डीजेविरोधातील भूमिकेला सोशल मीडियावरही मोठी चर्चा होत आहे. त्यांच्या भाषणातील संस्कृत श्लोक आणि अस्खलित मराठीमुळेही ते चर्चेत आले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी धार्मिक उत्सव, ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांच्या अधिकार-जबाबदाऱ्या यावरील चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.