
‘सन मराठी’वरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम बनली आहे. या मालिकेने तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचे मन जिंकले आहे, आणि त्याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण नुकतेच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाले.
84 वर्षीय आजोबा सीन पाहून अस्वस्थ झाले
मालिकेत सध्या सत्याच्या निवडणुकीतील विजयानंतरच्या मिरवणुकीदरम्यान मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते. हा प्रसंग पाहून प्रेक्षकांमध्ये भावनांचा पूर आला. विशेषतः, सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी गावातील 84 वर्षीय दत्तू कर्णे यांना या प्रसंगाने इतके अस्वस्थ केले की, त्यांनी कोणालाही न सांगता थेट साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला.
पोलीस स्टेशनला पोहोचले अन्…
दत्तू आजोबांनी सातारा पोलीस स्टेशनला पोहोचून अधिकार्यांना विचारले, “मंजू ठीक आहे ना? तिची प्रकृती कशी आहे?” त्यांच्या चेहर्यावर मंजूबद्दलची काळजी आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. साताऱ्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक सावंजी आणि कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी आजोबांच्या भावना समजून घेत त्यांना ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सेटवर नेण्याची विशेष व्यवस्था केली.
संपूर्ण युनिटच्या डोळ्यांत अश्रू आले
सेटवर पोहोचताच आजोबांनी मंजूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका राठी यांचा हात धरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी सत्याला त्याच्या आईच्या चुकीबद्दल सुनावले आणि इतर कलाकारांना खऱ्या व्यक्तिरेखा समजून आपली मते स्पष्टपणे मांडली. हा क्षण इतका भावनिक होता की, संपूर्ण युनिटच्या डोळ्यांत अश्रू आले.
आजोबांनी माझा हात धरून अभिनेत्रीच्या तब्येतीची विचारपूस केली
दरम्यान, आजोबांनी घरच्यांना न सांगता साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे कुटुंब काळजीत होते. आजोबा सातारा पोलीस स्टेशनला पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली. मालिकेच्या टीमने तत्काळ याची दखल घेतली आणि आजोबांशी प्रेमाने संवाद साधत त्यांना आदराने घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली. या घटनेबद्दल मोनिका राठी म्हणाल्या, “मंजू या पात्राला मिळणारे प्रेम शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. मला गोळी लागली म्हणून ८४ वर्षांचे आजोबा थेट सेटवर आले, हे आमच्यासाठी आश्चर्यकारक आणि भावनिक होते. सोशल मीडियावर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देतात, पण प्रत्यक्षात कोणी, विशेषतः इतक्या वयात, एवढा लांबचा प्रवास करून केवळ मालिकेतील पात्राची काळजी घेऊन सेटवर येणे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आजोबांनी माझा हात धरून माझ्या तब्येतीची विचारपूस केली, आणि त्यांच्या डोळ्यांतली काळजी पाहून आम्ही सारे भारावून गेलो. हे खरे यश आहे आणि एका कलाकारासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”
मालिकेचे प्रेक्षकांच्या हृदयाशी खोलवर नाते जोडले
‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका आता केवळ एक कथा राहिलेली नाही; तिने प्रेक्षकांच्या हृदयाशी खोलवर नाते जोडले आहे. मालिकेतील पात्रे, प्रसंग आणि भावना इतक्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात की, ते त्यात गुंतून जातात आणि त्यात जगू लागतात. प्रेक्षकांचे हे निखळ प्रेम ‘सन मराठी’ आणि ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सं smiling पूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पुरस्कार आहे.