Anjali Arora : इव्हेंटमध्ये ‘कच्चा बादाम’ गाणं वाजताच भडकली अंजली अरोरा ? शो मध्येच सोडत म्हणाली..
अंजली अरोराचा हा व्हिडीओ कानपूरमधील एका इव्हेंटचा आहे, ज्यामध्ये ती सहभागी झाली होती. त्या इव्हेंटमध्ये अंजली पोहोचताच बॅकग्राऊंडला 'कच्चा बादाम' हे व्हायरल झालेलं गाणं वाजू लागलं.

‘कच्चा बादाम’ गाण्यामुळे अंजली अरोरा रातोरात सोशल मीडियावर फेमस झाल होती. या गाण्यातील तिच्या डान्समुळे तिला खास ओळख मिळाली आणि त्याचनंतर तिला ‘लॉकअप’ सारखा रिॲलिटी शो देखील मिळाला. याचदरम्यान अंजली अरोरा आता पुन्हा एकदा चर्चेच्या झोतात आली आहे. इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या अंजलीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, त्यात ती प्रचंड भडकलेली दिसत्यो. अंजली अरोराचा हा व्हिडीओ कानपूरमधील एका इव्हेंटचा आहे, ज्यामध्ये ती सहभागी झाली होती. त्या इव्हेंटमध्ये अंजली पोहोचताच बॅकग्राऊंडला ‘कच्चा बादाम’ हे व्हायरल झालेलं गाणं वाजू लागलं. मग काय ? ते ऐकून अंजली चांगलीच भडकली आणि इव्हेंटमधून जाण्याची तिने धमकी दिली.
‘कच्चा बादाम’ गाणं ऐकून भडकली अंजली
खरंतर, गुरुवारी रात्री, 15 ऑक्टोबर रोजी, अंजली अरोरा कानपूरमधील मोतीझील येथील लाजपत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नगाडा नाइट दांडिया’ कार्यक्रमाला उपस्थित होती. यावेळी DJ ने ‘कच्चा बादाम’ हे गाणं लावताच ती संतापल्याचं बोललं जात आहे. तिने अचानक मध्येच नाच थांबवला आणि कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटवर अनेक प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अंजली अरोरा स्टेजवरून DJ च्या दिशेने जाताना दिसते. त्यावेळी पार्श्वभूमीवर ‘कच्चा बादाम’ हे गाणं वाजताना ऐकू येतं. व्हिडिओमध्ये ती DJ शी काहीतरी बोलताना दिसली, तर तिच्या टीममधील काही सदस्यही DJ कन्सोलजवळ येतात. या छोट्याशा संभाषणादरम्यान अंजली हातवारे करतानाही दिसत होती.
लोकांना लावले वेगवेगळे अर्थ
अंजली अरोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येताच त्याची चर्चा सुरू झाली. अनेकांच्या मते, DJ ने तेच गाणं लावल्यामुळे अंजली नाराज झाली, ज्या गाण्यामुळे तिला मोठी ओळख मिळाली होती. मात्र, व्हिडिओवरून तिच्या प्रतिक्रियेचं नेमकं कारण किंवा तिच्यात आणि DJ मध्ये झालेल्या संभाषणाचा अर्थ समजत नाही. त्यामुळे नेटकरी या घटनेचे आपापल्या परीने वेगवेगळे अर्थ लावत आहेत.
अंजली अरोराच्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली, ‘कच्चा बादाम’ या गाण्यामुळेच अंजली अरोरा प्रसिद्ध झाली आणि आता तेच गाणं लावल्यामुळे ती DJ वर नाराज होत्ये. किती विरोधाभास आहे!, असं त्याने लिहीलं. तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “लोकांना स्वतःच्या ओळखीचीच अडचण आहे… वा! हीच अधोगती आहे.” पुढे तिसऱ्या युजरने कमेंट केली की , “तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी तुम्हाला कधीच सन्मानाचं आयुष्य जगता येणार नाही.” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या होत्या.
सीतेची भूमिका केल्याने ट्रोल झाली होती अंजली अरोरा
अंजली अरोराच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, नुकतीच ती ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या चित्रपटात माता सीतेची भूमिका साकारताना दिसली. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. मात्र, अशा प्रतिक्रियांचा तिला त्रास होत नाही, असं यापूर्वी या टीकेला उत्तर देताना अंजलीने सांगितलं होतं. “मी आधी डान्स करत होते, मग सीतामाईची भूमिका कशी साकारू शकते, म्हणून लोक मला ट्रोल करत आहेत. प्रत्येकजण डान्स करतो; असा कोणता अभिनेता आहे जो डान्स करत नाही? मला डान्स करायला आवडतं. तो माझा छंद आहे आणि त्याची मला अजिबात लाज वाटत नाही.” असं तिने सुनावलं होतं.
” मला याचं (ट्रोलिंग) दुःख नाही. कारण आम्ही सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्ती आहोत आणि लोकांना आम्हाला जज करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे लोकांनी आम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं की नकारात्मक दृष्टिकोनातून हा त्यांचा निर्णय आहे. एखादी गोष्ट आवडायची की नाही, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे” असं मत तिने व्यक्त केलं होतं.
