Arbaaz Khan : सलमान खानचा उल्लेख होताच भडकला अरबाज, अचानक सोडली प्रेस मीट; नेमकं काय घडलं
एका इव्हेंटमध्ये फोटोग्राफरने सलमान खानचं नाव काढताच, अरबाज खान नाराज झाला आणि प्रेस मीटच सोडून निघून गेला. नेमकं काय घडलं ?

बॉलिवूड अभिनेता – फिल्ममेकर अरबाज खान (Arbaaz Khan) सध्या चर्चेत आला आहे. नुकताच तो एका इव्हेंटला उपस्थित राहिला होता, मात्र तिथे फोटोग्राफरने सलमान खानबद्दल (Salman Khan) त्याला प्रश्न विचारला. मात्र सलामन खानचं नाव ऐकताच अरबाज नाराज झाला आणि थेट तिथून निघून गेला. ‘वर्ल्ड गोल्ड काउन्सिल’च्या एका कार्यक्रमाला अरबाज खान आला होता. मीडिया त्याला काही प्रश्न विचारत होती. मात्र तेवढ्यातच एका फोटोग्राफरने त्याला ‘दबंग’ फेम स्टारबद्दल असा काही प्रश्न विचारला की तो ऐकून अरबाज थोडा असहज दिसला, आणि नाराजही झाला. अनेकांनी त्यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण तो काहीच बोलला नाही. थेट निघून गेला. त्याच्या या वर्तनाचा व्हिडीओ आता समोर आला असून इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत.
प्रेस मीट दरम्यान घडलं तरी काय ?
अरबाज खान मीडियाच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना एका फोटोग्राफरने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. फोटोग्राफर म्हणाला, “अरबाज सर, ज्या पद्धतीने सलमान सर ट्रोल्सविरुद्ध…” मात्र फोटोग्राफरला आपला प्रश्न पूर्ण करता येण्यापूर्वीच अरबाज खानने त्याला थांबवत, “Excuse me, thank you… thank you so much,” असं म्हटलं आणि पोडियमवरून उठून स्टेजच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. यानंतरही उपस्थित मीडियाकडून अरबाज खानला बोलण्याची आणि प्रश्नांची उत्तरं देण्याची विनंती सुरू होती. याचदरम्यान त्याला राग येण्यामागचं कारण विचारण्यात आलं. त्यावर अरबाजने विचारलं की, “ज्वेलरीशी संबंधित होता का तो प्रश्न? आजच्या इव्हेंटशी संबंधित होता का तो प्रश्न?” यावर फोटोग्राफरने “नाही सर,” असं उत्तर दिलं.
व्हिडीओवर नेटकऱ्यांची रिॲक्शन
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. अरबाज खानने फोटोग्राफरला धन्यवाद देत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा प्रश्न हा कार्यक्रमाशी संबंधित नसल्याचं त्याला वाटत असल्याचं या प्रसंगातून दिसून आलं.
कमेंट सेक्शनमध्ये एका युझरने लिहिलं, “तो बरोबर बोलतोय. अनेकदा लोक लिमिट ओलांडतात.” तर “अरबाजने बरोबर केलं” असं दुसऱ्या युझरने म्हटलं. तर आणखी एका युझरने “खूप छान केलं,” अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी मात्र अरबाजच्या वागण्यावर टीका केली. एका युझरने लिहिलं, “किती मूर्खपणा आहे. काहीही विचारायला लागतात.” काही नेटकऱ्यांनी असा सवालही केला की, सलमान खानशी संबंधित प्रश्न अरबाज खानला का विचारण्यात आला?
सलमानचं प्रकरण काय होतं?
काही दिवसांपूर्वी सलमान खानने ‘बिग बॉस 20’मध्ये सोशल मीडिया ट्रोल्स आणि पापाराझींना चांगलंच सुनावलं होतं. सेलिब्रिटींच्या लुक्सवर होणाऱ्या कमेंट्सपासून ते अभिनेत्रींच्या बॉडी शेमिंगपर्यंत आणि चुकीच्या अँगलने फोटो काढण्यापासून सोशल मीडिया पोस्टवर केल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट्सपर्यंत अनेक मुद्द्यांवर सलमानने भाष्य केलं होतं. सलमानच्या या भूमिकेची सोशल मीडियावर चर्चा झाली. त्यामुळेच कदाचित फोटोग्राफरला अरबाज खान यांच्याकडूनही याच विषयावर प्रतिक्रिया जाणून घ्यायची असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र, प्रश्न पूर्ण होण्याआधीच अरबाज यांनी पत्रकाराला थांबवलं आणि तिथून निघून गेला. हा प्रश्न कार्यक्रमाच्या संदर्भात नसल्यामुळे त्याने नाराजी व्यक्त केली असावी, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.