Bhooth Bangla: ‘भूत बंगला’ने ‘धुरंधर 2’ला केलं ओव्हरटेक; हमजाची जादू पडतेय फिकी
अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीही चांगली कमाई झाली असून या चित्रपटाने रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज'ला ओव्हरटेक केलं आहे. 17 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘भूत बंगला’ हा चित्रपट 17 एप्रिल रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सहा दिवस पूर्ण झाले असून प्रेक्षकांकडून त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय. ‘भूत बंगला’ने एकाअर्थी अक्षयच्या करिअरमधील दुष्काळाला मिटवलं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण पहिल्याच वीकेंडला या चित्रपटाने 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. तर चार दिवसांत ‘भूत बंगला’ने जगभरात 100 कोटींचा जादुई आकडा गाठला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाचा गेल्या महिनाभरापासून बोलबाला पहायला मिळत होता. आता ‘भूत बंगला’मुळे त्याच्या कमाईची गती झाली आहे.
‘भूत बंगला’ची कमाई-
- पहिला दिवस- 12.25 कोटी रुपये
- दुसरा दिवस- 19 कोटी रुपये
- तिसरा दिवस- 23 कोटी रुपये
- चौथा दिवस- 6.75 कोटी रुपये
- पाचवा दिवस- 8 कोटी रुपये
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘भूत बंगला’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी दुपारपर्यंत 3.74 कोटी रुपये कमावले आहेत. वीकडेच्या हिशोबाने ही कमाईसुद्धा ठीकठाक मानली जात आहे. दिवसाअखेर या कमाईत आणखी वाढ झाल्याची शक्यता आहे. यानुसार आतापर्यंत चित्रपटाची कमाई 76.49 कोटी रुपये झाली आहे. मंगळवारी अक्षय कुमारच्या या चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 118.12 कोटी रुपयांवर पोहोचलं होतं. ‘भूत बंगला’ने प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी ‘जॉली एलएलबी 3’पेक्षाही उत्तम कामगिरी केली. ‘जॉली एलएलबी 3’ने पाचव्या दिवशी 6.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. परंतु अद्याप हा चित्रपट ‘हाऊसफुल 5’पेक्षा खूप मागे आहे.
पेड प्रीव्ह्यूसह या चित्रपटाने 16 कोटी रुपयांनी बॉक्स ऑफिसवर ओपनिंग केली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रियदर्शनने केलं आहे. या जोडीने याआधी ‘दे दना दन’, ‘खट्टा मीठा’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘हेरा फेरी’, ‘भुल भुलैय्या’ यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा बजेट 120 कोटी रुपये आहे. लवकरच हा बजेट वसूल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जी कमाई होईल, ती नफ्यात मोजली जाईल. ‘भूत बंगला’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये अक्षय कुमार, परेश रावल, जिशू सेनगुप्ता, राजपाल यादव, तब्बू आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत.