Bigg Boss: बिग बॉसच्या घरात विवाहित असूनही अभिनेत्रीशी जवळीक, पत्नीने थेट पोस्ट करत सर्वच सांगितलं
Bigg Boss: सध्या सोशल मीडियावर बिग बॉसमधील स्पर्धकाच्या पत्नीची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने पतीची बिग बॉसच्या घरातील अभिनेत्रीशी असलेली जवळीक पाहून स्पष्ट

बिग बॉस हा टीव्हीवरील सर्वाधिक चर्चेत असणारा आणि वादग्रस्त शो. या घरात प्रवेश करणारा प्रत्येक स्पर्धक वेगवेगळ्या कसोट्यांना सामोरा जातो. कधीकधी मात्र या खेळाची झळ थेट त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रियजनांपर्यंत पोहोचते. सध्या घरातील सर्वाधिक चर्चेत असलेला आणि सतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेला चेहरा म्हणजे आसिफ. घरातील भांडणे आणि प्लॅनिंग-प्लॉटिंगच्या पलीकडे जाऊन आता त्याची सहस्पर्धक लव्ह गिल हिच्यासोबतची वाढती जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
लव्ह गिलसोबतच्या काही व्हायरल क्लिप्समुळे नेटकऱ्यांनी थेट आसिफच्या वैवाहिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. हे ट्रोलिंग असह्य झाल्यानंतर अखेर आसिफची पत्नी झेबा खान हिने स्वतः पुढे येत मौन सोडले आणि नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत ट्रोलर्सना चांगलेच सुनावले.
वाद नेमका कशावरून?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही क्लिप्समध्ये लव्ह गिल आसिफला मिठी मारताना दिसते, तर एका व्हिडिओमध्ये आसिफ निघून जात असताना ती त्याला अडवून धरताना दिसली. २४ तास चालणाऱ्या लाईव्ह फीडमधील या छोट्या क्लिप्स शेअर करत नेटकऱ्यांनी आसिफच्या चारित्र्यावर चिखलफेक सुरू केली. यापूर्वीही उदिती सिंगने आसिफच्या उगाच जवळीक साधण्याबाबत आणि स्पर्शावर आक्षेप घेत वाद घातला होता, ज्यावर आसिफने स्वतःचा बचाव केला होता. आता लव्ह गिलच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याला टार्गेट केले गेले.
View this post on Instagram
झेबा खानचे सडेतोड उत्तर
वाढत्या ट्रोलिंगला उत्तर देताना झेबाने आसिफच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक स्पष्ट आणि भावपूर्ण पोस्ट शेअर केली. तिने, “आसिफची पत्नी म्हणून या सर्व विषयावर अत्यंत स्पष्टपणे बोलणे मला गरजेचे वाटते. जे लोक त्या काही सेकंदांच्या क्लिप्सवरून वेगळाच अजेंडा चालवत आहेत आणि आमच्या वैवाहिक नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, त्यांनी कृपया सोशल मीडियावरील १० सेकंदांच्या तोडमोड केलेल्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये. त्याऐवजी २४ तास चालणारे लाईव्ह फीड पाहा. लाईव्ह फीड पाहिले तर तुम्हाला कळेल की तो घरात माझ्याबद्दल, आमच्या संसाराबद्दल किती प्रेमाने बोलत असतो. एक पती म्हणून मी त्याला जेवढे ओळखते, ते सोशल मीडियावरील एका क्लिपमध्ये कधीच मावू शकत नाही. आमचे नाते अत्यंत सुरक्षित आणि मजबूत आहे, त्यामुळे मला कोणापुढेही कसलेही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही” या आशयाची पोस्ट केली आहे.
पोस्टच्या शेवटी झेबा म्हणाली, “घराच्या आत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गेम खेळत आहे. त्यांना तो खेळू द्या. पण त्या खेळाचा आधार घेऊन एखाद्याच्या चारित्र्याचा किंवा कोणाच्या संसाराचा असा जाहीर पंचनामा करू नका. आसिफचा प्रवास एक माणूस म्हणून पाहा आणि तो प्रत्यक्षात जसा आहे, त्यासाठी त्याला पाठिंबा द्या. काही मिनिटांच्या क्लिप्स एक खोटी स्टोरी रचू शकतात, पण त्या कधीही आमचे मूळ सत्य बदलू शकत नाहीत.”
झेबा खानच्या या खंबीर आणि स्पष्ट उत्तराने ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे. आई-वडील आणि पत्नीसारख्या जवळच्या नातेवाईकांचा पाठिंबा मिळाल्याने आसिफला घरात अधिक बळ मिळेल, असेच अनेकांना वाटत आहे.
