Sharad Kapoor : कामच तुम्हाला लाथाडतं…शरद कपूरबद्दल दीपाली सय्यदचं वक्तव्य, सांगितला अभिनेत्याचा प्रसंग

Deepali Sayyed On Sharad Kapoor : शरद कपूरबद्दल दीपाली सय्यदनं केलेलं वक्तव्य चर्चेत आलं असून अभिनेत्रीनं अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला आहे.

Sharad Kapoor : कामच तुम्हाला लाथाडतं...शरद कपूरबद्दल दीपाली सय्यदचं वक्तव्य, सांगितला अभिनेत्याचा प्रसंग
| Updated on: Nov 27, 2026 | 6:18 PM

अभिनेता शरद कपूरचा संघर्ष हा सध्या मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीविषयी आणि आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा सुरू झाली. मात्र, शरद कपूरनं आर्थिक अडचणीपेक्षा पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात काम मिळवण्याची इच्छा अधिक महत्त्वाची असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अभिनयापासून दूर राहण्यामागे प्रकृतीच्या समस्या आणि मानसिक तणाव ही कारणं असल्याचं त्यानं सांगितलं आहे. पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याला बराच काळ अंथरुणावर राहावं लागलेलं. अशातच आता मराठी अभिनेत्री दीपाली सय्यदनं शरद कपूरबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Loading...

बॉलिवूड अभिनेता शरद कपूर याच्या कारकिर्दीबद्दल बोलताना त्यांनी काही धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. एकेकाळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या शरद कपूरची आजची परिस्थिती पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. इतकंच नाही, तर शरदसोबत लंडनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला एक प्रसंगही त्यांनी सांगितला आहे.

शरद कपूरबद्दल दीपालीचं वक्तव्य

दीपाली सय्यद म्हणाली की, ‘शरद कपूरनेही सिनेमात काम केलंय. पण, आता त्याचं काय झालंय बघा. सिने–इंडस्ट्रीमध्ये खूप काही गोष्टी होतात. आयुष्यात खूप गोष्टी येतात, जातात. पण, त्यात तुम्ही स्वतःला कसं ठेवता हे खूप महत्वाचं आहे. शरदच्या आयुष्यात एक वेळ अशी आली असेल, जेव्हा त्यानं काम करणं सोडून दिलं असेल आणि त्याने गिव्ह अप केलं असणार. म्हणून, त्याच्यावर ही अशी वेळ आली.’

‘मी शरदसोबत एक सिनेमा केलेला. आम्ही लंडनला शूटिंगसाठी गेलेलो. पण, तो झालाच नाही. आम्ही आठ दिवस लंडनला होतो. दोन दिवसात सनी देओल येणार होते. जर तुम्ही कामाचा आदर नाही केलात तर, ते कामच तुम्हाला लाथाडतं, तेच तुम्हाला जवळ घेत नाही. तसंच शरदसोबत झालंय. देव करो, आणि पुन्हा त्याची इनींग सुरू होऊदे. त्यावेळी, शूटिंगदरम्यान तो मला भेटलेला आणि शूटिंगदरम्यानच दोन दिवस गायब होता. त्यामुळे तो सिनेमा थांबला.’ असंही दीपालीनं सांगितलं. ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत दीपाली सय्यद बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us