Dhurandhar : रणवीर सिंहने ‘धुरंधर’चं प्रमोशन का केलं नाही? 3000 कोटींच्या यशानंतर मार्केटिंग हेडने सांगितलं खरं कारण!

Dhurandhar : रणवीर सिंहचा 'धुरंधर' आणि पार्ट 2 ने मिळून 3000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण त्याने फिल्म रिलीजपूर्वी प्रमोशन केलं नव्हतं, त्यामागचं कारण आता समोर आलं आहे.

Dhurandhar : रणवीर सिंहने ‘धुरंधर’चं प्रमोशन का केलं नाही? 3000 कोटींच्या यशानंतर मार्केटिंग हेडने सांगितलं खरं कारण!
| Updated on: Oct 21, 2026 | 8:59 PM

Dhurandhar : 2026 या वर्षातील सर्वात मोठा आणि ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘धुरंधर: द रिव्हेंज’ . या स्पाय -थ्रिलर फिल्मने जगभरात 1800 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. विशेष म्हणजे या फ्रँचायजीच्या दोन्ही फिल्म्सनी एकूण मिळून 3000 कोटींपेक्षा जास्त आकडा पार केला. या फिल्मच्या रेकॉर्ड-तोड कामगिरीपूर्वी, आधी मार्केटिंग आणि प्रमोशनचा पॅटर्न खूप चर्चेत होता. मात्र फिल्मच्या रिलीज पूर्वी मुख्य अभिनेता रणवीर सिंगने प्रमोशन केलं नव्हतं. सहसा मोठ्या फिल्म्ससाठी सेलिब्रिटी आवर्जून प्रमोशन करतात, पण रणवीर अपवाद ठरला. आता या चित्रपटाचा मार्केटिंग हेड वरूण गुप्ताने यामागच्या मोठ्या कारणाचा खुलासा केला आहे.

आदित्य धर आणि रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर मोठी कामगिरी करत यश मिळवलं. मात्र रिलीजपूर्वी या चित्रपटाच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीवर बरीच टीका झाली होती. चित्रपटाबद्दल फार चर्चा झाली नाही, त्याबद्दल काही चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. तर आता ‘एव्हरीडे एम्पायर्स’ पॉडकास्टमध्ये संवाद साधताना ‘मॅक्स मार्केटिंग’च्या वरूण गुप्ताने मोठं गुपित उलगडलं.

Loading...

रणवीर सिंहने का नाही केलं प्रमोशन ?

‘मॅक्स मार्केटिंग’चे संस्थापक आणि ‘धुरंधर’चे मार्केटिंग हेड वरुण गुप्ता यांनी सांगितल की, रणवीर सिंह आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी मिळून एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. चित्रपटातील आशयालाच प्रेक्षकांशी संवाद साधू द्यायचा, असं त्यांनी ठरवलं होते. यामागचे कारण स्पष्ट करताना वरुण यांनी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ आणि ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटांचाही उल्लेख केला. वरुण गुप्ता म्हणाले, “रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दुसरीकडे, ‘धुरंधर’च्या आधी रणवीर सिंहच्या चित्रपटांना विशेष यश मिळालं नव्हतं. त्यामुळे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी एकत्र येऊन चित्रपट आणि त्यातील आशयालाच स्वतःची बाजू मांडू द्यायची, असा निर्णय घेतला. यासाठी कलाकारांनी वेगळं काही बोलण्याची गरज नाही, असं त्यांचं मत होतं.”

पुढे ते म्हणाले की ‘धुरंधर’च्या आधी असा कोणताही हिंदी चित्रपट त्यांना आठवत नाही, ज्याने प्रदर्शनाच्या तब्बल सहा महिने आधी साडेतीन मिनिटांचा प्रमोशनल व्हिडीओ प्रदर्शित केला होता. हॉलिवूडमध्ये अशा प्रकारची मार्केटिंग रणनीती सामान्य असली, तरी हिंदी चित्रपटसृष्टीत हा प्रयोग वेगळा होता. विशेष म्हणजे, चित्रपटातील कलाकारांची निवडही निश्चित झाली नव्हती, तेव्हापासूनच त्यांची टीम ‘धुरंधर’च्या मार्केटिंगसाठी काम करत होती. याच काळात त्यांनी चित्रपटाची स्क्रिप्टही ऐकली होती, असे वरुण गुप्ता यांनी सांगितले.

‘धुरंधर’ बद्दल नेमकी काय चर्चा झाली होती ?

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या प्रमोशनवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. चित्रपटाची मार्केटिंग मोहीम प्रभावी नसल्याचे आणि बाजारात त्याबाबत पुरेशी चर्चा होत नसल्याचे सांगणारे लेखही प्रसिद्ध झाले होते. मात्र, दिग्दर्शक आदित्य धर हे या टीकेला शांतपणे सामोरे गेले. वरुण गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, आदित्य हे लेख आपल्या टीमला पाठवायचे आणि त्यावर केवळ ‘सगळं ठीक आहे’ एवढीच प्रतिक्रिया द्यायचे. त्यांनी कोणावरही दोषारोप केले नाहीत किंवा टीमच्या कामावर अविश्वास दाखवला नाही.

आदित्य धर यांचा हा शांत स्वभाव आणि टीमवरील विश्वास सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरला. मार्केटिंग हेडच्या मते, जेव्हा एखादा नेता आपल्या टीमवर पूर्ण विश्वास दाखवतो, तेव्हा टीममधील प्रत्येक सदस्य अधिक मेहनत घेऊन काम करतो. ‘धुरंधर’ला मिळालेल्या यशामागे संपूर्ण टीमचे योगदान आणि प्रत्येकाची मेहनत आहे, असेही त्यांनी नमूद केलं.

पेड स्मिअर कॅम्पेन’बाबतही केला खुलासा

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी झालेल्या टीकेबरोबरच वरुण गुप्ता यांनी कथित ‘पेड स्मिअर कॅम्पेन’बाबतही आपले मत मांडलं. मोठ्या स्टारचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी त्याच्यावर टीका केली जात असल्याचे त्यांनी सांगितलं.

वरुण गुप्ता म्हणाले, “जेव्हा जेव्हा एखाद्या मोठ्या स्टारचा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असतो, तेव्हा काही लोक कोणतेही ठोस कारण नसताना त्या चित्रपटावर टीका करू लागतात. निर्मात्यांसाठी ही परिस्थिती कठीण असते. कारण प्रमोशनच्या बाबतीत त्यांना कोणत्याही परिस्थितीत लक्ष्य केले जाते. एकूणच, निर्माते आणि कलाकारांना प्रत्येक परिस्थितीत टीकेचा सामना करावा लागतो.”  ‘धुरंधर’च्या यशानंतर या चित्रपटाच्या मार्केटिंग मोहिमेची आणि त्यामागील टीमच्या मेहनतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us