‘धुरंधर 2’मधील जसकीरतच्या बहिणीची जोरदार चर्चा; अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे ‘हमजाची यलिना’सुद्धा ठरतेय फेल

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटात जसकीरत सिंह रंगीची बहीण जसलीन रंगीची भूमिका अभिनेत्री परवीर कौर पंधेरने साकारली आहे. खऱ्या आयुष्यात परवीर खूपच सुंदर असून ती सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते.

धुरंधर 2मधील जसकीरतच्या बहिणीची जोरदार चर्चा; अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे हमजाची यलिनासुद्धा ठरतेय फेल
अभिनेत्री परवीर कौर पंधेर, रणवीर सिंह
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2026 | 9:23 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये रणवीर सिंहने साकारलेल्या हमजा आणि जसकीरत सिंह रंगी या भूमिकांचं प्रचंड कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याची ऑनस्क्रीन बहीण जसलीन रंगीसुद्धा प्रकाशझोतात आली आहे. या चित्रपटात जसकीरत आणि जसलीन यांच्यात एक अत्यंत भावूक सीन आहे, जो कथेचा महत्त्वाचा भाग आहे. हा सीन पाहून प्रेक्षकांचाही कंठ दाटून येतो. ‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये जसकीरतचं खरं कुटुंब आणि त्याच्या सूडाची कहाणी दाखवण्यात आली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील प्रत्येक कलाकाराविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच सोशल मीडियावर रणवीरच्या ऑनस्क्रीन बहिणीविषयी बरीच चर्चा दिसून येत आहे.

‘धुरंधर 2’मध्ये जसलीनबद्दल नेमकं काय दाखवलंय, त्याबद्दल आधी जाणून घेऊयात. जसलीन ही अत्यंत प्रेमळ आणि उत्साही मुलगी असते, जिचं तिच्या भावावर म्हणजेच जसकीरतवर खूप प्रेम असतं. जेव्हा जसलीनचं लग्न ठरतं, तेव्हा जसकीरत त्यासाठी सर्व तयारी करू लागतो आणि कोणतीही गोष्ट कमी पडू नये याची काळजी घेतो. परंतु तेव्हा एका भ्रष्ट नेत्याचे लोक त्याच्या बहिणीचं अपहरण करतात. बहिणीला वाचवण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो आणि त्यात त्याला यशही मिळत. परंतु त्याचवेळी या दोघांमध्ये एक असा भावूक क्षण दाखवला आहे, जो पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

चित्रपटात जसलीन रंगीची भूमिका अभिनेरी परी पांधेरने साकारली आहे. ती एक पंजाबी गायिका, नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. परीचं पूर्ण नाव परवीर कौर पांधेर असं आहे. तिने ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. परंतु त्याआधी तिने पंजाबी इंडस्ट्रीत चांगलंच नाव कमावलं आहे. परीने 2023 मध्ये ‘अन्ही दिया मझाक ए’ या पंजाबी रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तिने स्थानिक म्युझिक व्हिडीओ आणि गाण्यांमध्येही काम केलं आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 850k फॉलोअर्स आहेत. ‘धुरंधर 2’मध्ये काम करण्याची संधी जेव्हा तिला मिळाली, तेव्हा सोशल मीडियावर तिने पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या.

परीने लिहिलं, ‘तो सीन केल्यानंतर मला खूप अभिमान वाटला. मी स्वत:ला ओळखू शकत नव्हते आणि ते पाहताना थोडी भीतीही वाटत होती. परंतु वाहेगुरू नेहमीच माझ्यासोबत आहेत आणि या चित्रपटाचा भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे.’ चित्रपटातील जसलीन आणि जसकीरत यांच्या त्याच दृश्याचं ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शित एस. एस. राजामौली यांनीसुद्धा कौतुक केलं होतं.

Follow Us