Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’चं वादळ; चार दिवसांत तब्बल इतकी कमाई
Dhurandhar 2 Box Office Collection Day 4: रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरअ अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांत 'धुरंधर 2'ने कमाईचा नवीन विक्रम रचला आहे.

सध्या थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचीच जोरदार चर्चा आहे. दमदार कथा, अभिनय आणि दिग्दर्शन यांच्या जोरावर या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अगदी पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी ‘धुरंधर 2’ने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांनाच थक्क केलं आहे. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचले आहेत. रणवीरच्या करिअरमधील हा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला आहे. यामध्ये त्याच्यासोबत अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल अशी आधीपासूनच चर्चा होती. बॉक्स ऑफिसवर सध्या तसंच घडताना दिसतंय. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी ‘धुरंधर 2’ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 103 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. ही गेल्या चार दिवसांतील दुसरी सर्वाधिक कमाई ठरली. यामुळे या चित्रपटाचं बॉक्स ऑफ कलेक्शन आता 450 कोटींच्या घरात पोहोचला आहे. रविवारी ‘धुरंधर 2’चे तब्बल 20,100 शोज होते.
‘धुरंधर 2’ची कमाई
- पेड प्रीव्ह्यू- 43 कोटी रुपये
- पहिला दिवस- 102.55 कोटी रुपये
- दुसरा दिवस- 80.72 कोटी रुपये
- तिसरा दिवस- 113 कोटी रुपये
- चौथा दिवस- 103.45 कोटी रुपये
- एकूण कमाई– 442.72 कोटी रुपये
‘धुरंधर : द रिव्हेंज’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांहून अधिक कमाई करून नवीन विक्रम रचला आहे. आजवर कोणत्याच हिंदी चित्रपटाने इतकी मोठी ओपनिंग वीकेंड कमाई केलेली नव्हती. आदित्य धर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहने भारतीय गुप्तहेर हमजा अली मजारीची भूमिका साकारली आहे. पाकिस्तानच्या ल्यारीमधील दहशतवादी नेटवर्कमध्ये शिरून तो त्यांचा खात्मा करतो. हा एक पॅन इंडिया चित्रपट असून हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही तो प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सर्वाधिक कमाई ही हिंदी भाषेतच झाली आहे.
