Hema Malini: 77 वर्षीय हेमा मालिनी यांचं दुर्गा रूपातील नृत्य, अदाकारी पाहून चाहते मंत्रमुग्ध; पहा व्हिडीओ
Hema Malini: हेमा मालिनी यांच्या या सादरीकरणामुळे त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कलागुणांची झलक पाहायला मिळाली. वय हा केवळ आकडा असतो, हे त्यांच्या नृत्यावरील प्रेमातून दिसून येतं. त्यामुळेच त्यांच्या दुर्गा रूपातील सादरीकरणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Hema Malini: बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी आजही आपल्या अभिनयाने आणि नृत्यकलेने प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. वयाच्या 77 व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि कलेप्रती असलेलं समर्पण पाहून चाहते थक्क झाले आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने हेमा मालिनी यांनी देवी दुर्गेच्या रूपात सादर केलेल्या खास नृत्यनाटिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हैदराबादमध्ये आयोजित नवरात्रीच्या कार्यक्रमात त्यांनी ‘दुर्गा’ ही प्रसिद्ध नृत्यनाटिका सादर केली. त्यांच्या या सादरीकरणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हेमा मालिनी यांनी 11 ऑक्टोबर 2026 रोजी हैदराबादमधील क्लासिक कन्व्हेन्शन सेंटर इथं आपल्या ‘दुर्गा’ या नृत्यनाटिकेचं सादरीकरण केलं.
या सादरीकरणात हेमा मालिनी यांनी देवी दुर्गेचं सामर्थ्य, भक्ती आणि दुष्ट शक्तींवरील विजय नृत्याच्या माध्यमातून उलगडला. पारंपरिक नृत्यशैली, आकर्षक वेशभूषा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भाव यामुळे सादरीकरणाला विशेष रंगत आली. त्यांच्या नृत्याने उपस्थित प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. कार्यक्रमानंतर हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर आपल्या सादरीकरणाची झलक शेअर केली. नवरात्रीसारख्या पवित्र सणात देवी दुर्गेची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हे सादरीकरण करता आल्याने आपण धन्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. वयाच्या 77व्या वर्षीही त्यांच्यातील ऊर्जा, नृत्यावरील प्रेम आणि मंचावर सहजतेने वावरण्याची शैली पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. हेमा मालिनी यांची ओळख केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर एक कुशल शास्त्रीय नृत्यांगना म्हणूनही आहे. चित्रपटसृष्टीत मोठं यश मिळवल्यानंतरही त्यांनी नृत्यकलेशी असलेलं नातं कायम जपलं आहे. ‘मीरा’, ‘रामायण’ आणि ‘दुर्गा’ यांसारख्या नृत्यनाटिकांमधून त्यांनी भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांचं सादरीकरण केलं आहे.
हेमा मालिनी यांनी यापूर्वीही नृत्य हे आपलं पहिलं प्रेम असल्याचं सांगितलं आहे. अभिनयामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली असली, तरी नृत्यकलेने त्यांना एक वेगळी ओळख दिली. त्यांच्या वडिलांनीही त्यांना नृत्य आणि नृत्यनाटिकांच्या क्षेत्रात प्रोत्साहन दिलं होतं. आजच्या काळातही हेमा मालिनी भारतीय शास्त्रीय नृत्याची परंपरा पुढे नेत आहेत. त्यांच्या ‘दुर्गा’ सादरीकरणातून देवीचं सामर्थ्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश दिला जातो. नवरात्रीच्या उत्सवात अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असतं.
