Imran Khan: इम्रान खानला मोदी सरकारविरोधात पोस्ट करण्यासाठी मिळालेली 15 लाखांची ऑफर? सत्य आलं समोर
Imran Khan: एकीकडे इम्रान खानच्या आंदोलनातील सहभागाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे 15 लाख रुपयांच्या कथित ऑफरचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. यामागचं नेमकं सत्य काय, ते जाणून घेऊयात..

Imran Khan: आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रानला भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आली. याचदरम्यान, मोदी सरकारविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी त्याला 15 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा करणारा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. या पोस्टमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र, या दाव्याची सत्यता काय आहे? इम्रानने खरंच अशी पोस्ट केली होती का? याबद्दल जाणून घेऊयात..
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये इम्रान खानच्या नावाने एक कथित इन्स्टाग्राम स्टोरी दाखवण्यात आली आहे. या पोस्टमध्ये मोदी सरकारविरोधात पोस्ट करण्यासाठी 15 लाख रुपये देण्याची ऑफर मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पैसे घेण्यास नकार देऊन आपण कोणत्याही मोबदल्याशिवाय आंदोलनात सहभागी झाल्याचं या कथित पोस्टमध्ये म्हटलं होतं. हा स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. काही युजर्सनी या दाव्यावर विश्वास ठेवला, तर काहींनी स्क्रीनशॉटच्या सत्यतेवरच प्रश्न उपस्थित केले. काही युजर्सनी हा स्क्रीनशॉट बनावट किंवा एआयच्या मदतीने तयार केलेला असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली.
या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे इम्रान खानच्या अधिकृत इन्स्टाग्राम प्रोफाइलवर अशी कोणतीही स्टोरी आढळली नाही. त्यामुळे इम्रानने स्वतः मोदी सरकारविरोधात पोस्ट करण्यासाठी 15 लाख रुपयांची ऑफर मिळाल्याचा दावा केला होता, या वृत्तात काही तथ्य नाही. इम्रान खानच्या नावाने हा स्क्रीनशॉट व्हायरल होण्यामागे त्याच्याशी संबंधित ताज्या घडामोडींची पार्श्वभूमी आहे. 10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात इम्रान सहभागी झाला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.
इम्रान हा अमेरिकेचा नागरिक असून त्याच्याकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड आहे. आंदोलनातील सहभागाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसला न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही त्याने केली आहे.