विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर यांनी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाची ही दृश्ये पाहून खूप त्रास होत असल्याचं ते म्हणाले. त्याचसोबत अभिनेत्री प्रिती झिंटानेही याप्रकरणी ट्विट केलं आहे.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन
अभिजीत दीपके, जॉनी लिव्हर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2026 | 11:27 AM

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली असंख्य विद्यार्थी, तरुणवर्ग आंदोलन करत आहेत. मात्र या विद्यार्थी आणि तरुण आंदोलकांना पोलीस आणि निमलष्करी जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपलं मत मांडत आहेत. अभिनेता जॉनी लिव्हरनेही या आंदोलनावर प्रतिक्रिया देत सरकारला विनंती केली आहे. “दिल्लीत विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय, ते पाहून त्रास होतोय. सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात. आंदोलन करणाऱ्या मुलांचं आणि भविष्यात विद्यार्थ्यांचं चांगलं व्हावं, हीच इच्छा आहे” असं ते म्हणाले.

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटानेही सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘मला आशा आहे की आपलं सरकार सोनम वांगचूक आणि विद्यार्थी संघटनांशी संवाद सुरू करेल, जेणेकरून त्यांची प्रकृती अधिक खालावणार नाही. सोनमजी, कृपया तुमचं उपोषण संपवा. तुमचं आरोग्य या लढ्याइतकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही आणि विद्यार्थी भारताच्या आणि आपल्या तरुण पिढीच्या भविष्यासाठी लढत आहात. आपली शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या या लढ्यात प्रत्येक विद्यार्थ्याला आणि सोनम वांगचूक यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्हा सर्वांना अधिक धैर्य मिळो’, असं तिने म्हटलंय.

प्रिती झिंटाची पोस्ट-

कॉक्रोच जनता पार्टीने सोमवारी ‘चलो संसद’ मोर्चा काढला. या मोर्चात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले होते. अभिनेत्री शबाना आझमी, प्रकाश राज हे आंदोलनात दिसले. शबाना आझमी यांनी इन्स्टाग्रामवर आंदोलनाचे अनेक व्हिडीओ शेअर केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची तब्येतही बिघडली होती. त्यानंतर काहींनी त्यांची मदत करत त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले होते.रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनीही टविट करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला. ‘विद्यार्थी आपल्या लोकशाहीची नस आहेत आणि आपल्या देशाच्या भविष्याचे खरे विधाते आहेत. त्यांचा आवाज स्पष्टपणे आण कोणत्याही भितीविना ऐकला गेला पाहिजे’ अशी अपेक्षा त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये व्यक्त केली. याशिवाय अभिनेता-गायक दिलजित दोसांज, अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेश यांनीही विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us