‘धुरंधर’ रणवीरला देवीची नक्कल करणं महागात; मंदिरात जाऊन मागणार माफी

'कांतारा'मधल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याप्रकरणी विनशर्त माफी मागणार असल्याचं रणवीर सिंहने कोर्टात स्पष्ट केलं आहे. रणवीरने मंचावर चावुंडी देवीची नक्कल करून 'भूत' म्हणून उल्लेख केला होता. याप्रकरणी कोर्टात सुनावणी पार पडली.

धुरंधर रणवीरला देवीची नक्कल करणं महागात; मंदिरात जाऊन मागणार माफी
Rishab Shetty and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 25, 2026 | 9:07 AM

अभिनेता रणवीर सिंह सध्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर आहे. या चित्रपटातील दमदार कामगिरीमुळे त्याचं एकीकडे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे एका कार्यक्रमात मंचावर देवीची नक्कल केल्याने त्याला कोर्टाने फटकारलं आहे. हे प्रकरण ‘कांतारा’ या चित्रपटाशी संबंधित आहे. गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणवीरने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ‘इफ्फी’च्या मंचावर रणवीरने चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केला होता. याप्रकरणी आता 24 मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात रणवीरकडून हे स्पष्ट करण्यात आलं की तो विनशर्त माफी मागणार असून त्यासाठी तो प्रतिज्ञापत्रही सादर करणार आहे. इतकंच नव्हे तर चावुंडी देवीच्या मंदिरात जाऊन तिथेही माफी मागणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.

माफीचं प्रतिज्ञापत्र देणार अन् मंदिरातही क्षमा मागणार

रणवीरच्या या दाव्यांशी विरोधी पक्ष सहमत नसल्याचं दिसून आलं. त्यांनी कोर्टात सांगितलं की, रणवीरने त्याच्या चुकीबद्दल सोशल मीडियावरील पोस्टद्वारे माफी मागितली होती. परंतु त्याने ती पोस्ट पीआरकडून न करता जाहीरपणे स्वत: माफी मागायला पाहिजे होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. ‘इफ्फी’च्या मंचावरील कृत्यामुळे रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. 24 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रणवीरचे वकील साजन पूवैय्या म्हणाले, “रणवीर माफी मागणारं प्रतिज्ञपत्र दाखल करेल आणि क्षमा मागण्यासाठी मंदिरातही जाईल.” परंतु रणवीरची माफी ही वरवरची होती, ती प्रामाणिक नव्हती, असा आरोप तक्रारदाराच्या वकिलांनी केला. रणवीरने फक्त सोशल मीडियावर माफी मागितली आणि त्याचा तो अकाऊंट मॅनेजर सांभाळतो. त्यामुळे त्याने चावुंडी मंदिरात जाऊन माफी मागायला हवी, असं ते म्हणाले.

रणवीरचा तो व्हिडीओ

कोर्टाने फटकारलं

या सुनावणीदरम्यान न्यायाधीश एम. नागप्रसन्न म्हणाले, “रणवीरची कृती योग्य नव्हती. ती चूकच होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. तोपर्यंत रणवीरने माफी मागितली तर हे प्रकरण बंद करण्याचा विचार केला जाईल. त्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.” विशेष म्हणजे हा वाद असतानाही ‘कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टीने रणवीरच्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचं कौतुक करणारी पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती.

Follow Us