King : शाहरुखच्या ‘किंग’साठी दीपिका पुन्हा सेटवर येणार ? शूटिंगबद्दल मोठी अपडेट समोर
King : शाहरुख खानचा 'किंग' हा या वर्षातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित , सर्वात मोठा चित्रपट आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा पिक्चर रिलीज होणार आहे.सध्या चित्रपटाचं उर्वरित काम सुरू आहे. शाहरुख आणि दीपिकाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

King : अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पाडुकोण जेव्हा-जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चाहत्यांसाठी ती मोठी ट्रीट असते. ही सर्वात बेस्ट ऑनस्क्रीन जोडी असून दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. प्रेक्षकांनाही त्यांची जोडी खूप आवडते, त्यांच्यावर नेहमी प्रेमाचा भरभरून वर्षाव होतो. दीपिकाला तर शाहरूकची लकी चार्म मानलं जातं. एक कॅमिओ का असेना, पण ती शाहरुखच्या बहुतांश चित्रपटात असतेचय आता दोघेही KING फिल्ममध्ये एकत्र काम करत आहेत. या मूव्हीमध्ये शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत असून दीपिका काही वेळासाठी दिसणार आहे. त्यासाठीच तिने काही काळापूर्वी एका गाण्याचं शूटिंग केलं होतं. विदेशात झालेल्या या शूटिंगच्या काही क्लिप्सदेखील व्हायरल झाल्या होत्या. मात्र आता अशी चर्चा सुरू आहे की KING चं शूटिंग अजून पूर्ण झालं नसून, शाहरुख-दीपिका पुन्हा एकत्र दिसू शकतात.
नुकताच ‘व्हरायटी इंडिया’मध्ये यासंदर्भात एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्यानुसार, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण त्यांच्या ‘किंग’ या चित्रपटातील एका भव्य गाण्याच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. या गाण्याचं शूटिंग मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे, या गाण्यात चित्रपटातील संपूर्ण कलाकारांची टीम दिसणार असून, वैभवी मर्चंट या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन करणार आहे. यापूर्वी शाहरुख आणि दीपिका यांनी परदेशात एका रोमँटिक गाण्याचं शूटिंग केलं होतं. मात्र, आता या नव्या गाण्यात दोघांसोबतच चित्रपटातील संपूर्ण कलाकार दिसणार आहेत. त्यामुळे हे एक भव्य गाणं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कधी शूट होणार KING चं गाणं ?
नुकत्याच समोर आलेल्या या रिपोर्टनुसार, सध्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असून, 26 ऑक्टोबरपासून या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, शाहरुख खान आणि वैभवी मर्चंट यांचं हे आठवं कोलॅबोरेशन असेल. यापूर्वी दोघांनी ‘जवान’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दरम्यान, या गाण्याच्या शूटिंगसाठी संपूर्ण टीम दक्षिण आफ्रिकेला जाणार असल्याची चर्चा आधी सुरू होती. तिथे या गाण्याचं शूटिंग केलं जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, असं काही होणार नाही. या गाण्याचं शूटिंग मुंबईतच होणार असून, त्यासाठी जवळपास एक आठवडा लागणार आहे. या भव्य गाण्याच्या चित्रीकरणासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.
किती वेळा एकत्र दिसले शाहरुख-दीपिका ?
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची दोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते दोघे आत्तापर्यंत 5 फिल्म्समध्ये एकत्र दिसले. 2007 साली आलेल्या ‘ओम शांति ओम’ या ब्लॉकबस्ट्र चित्रपटातून दीपिकाने पदार्पण केलं, त्यात शाहरुखची प्रमुख भूमिका होती. त्यानंतर 2013 साली ही जोडी रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या ॲक्शन-कॉमेडी फिल्ममद्ये दिसली. तर 2014 साली फराह खानच्या मल्टीस्टारर ‘हॅप्पी न्यू ईअर’ मध्येही शाहरुख-दीपिका एकत्र आले होते. 2018 साली रिलीज झालेल्या ‘झिरो’मध्ये शाहरुख खान आणि अनु्षका शर्मा प्रमुख भूमिकेत होते, त्यात दीपिकाने एक खास कॅमिओ केला. तर 2023 साली रिलीज झालेल्या ‘पठाण’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातही त्यांची जोडी होती. तसेच ‘जवान’ मूव्हीमध्येही दीपिकाचा कॅमिओ होता.