कुणाल कामराकडून उमर खालिदच्या समर्थनार्थ पोस्ट; तुरुंगातल्या मित्राचे शब्द शेअर करत म्हणाला..
उमर खालिदला सप्टेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. दिल्ली दंगलीतील कथित कटाच्या प्रकरणात तो UAPA अंतर्गत तुरुंगात आहे. त्याच्या जामीन अर्जांवर यापूर्वी विविध न्यायालयांत सुनावणी झाली असून त्याला दिलासा मिळालेला नाही.

दिल्ली दंगलीप्रकरणी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) अटकेत असलेला माजी जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उमर खालिदचे तुरुंगातून कुटुंबीय आणि मित्रांसाठी लिहिलेले शब्द सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘माझं नाव उमर खालिद आहे आणि मी दहशतवादी नाही’, या विधानातून उमरने आपल्यावरील आरोपांबाबत भूमिका मांडली आहे. त्याच्या या लिखाणात माध्यमांमधील चर्चेपासून ते न्यायालयीन खटल्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पोस्टमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
कुणाल कामराने ही पोस्ट शेअर करताना म्हटलं की, उमर खालिदबद्दल माध्यमांमधून अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या; मात्र त्याला स्वतःची बाजू मांडण्यासाठी फारशी संधी मिळालेली नाही. गेल्या सहा वर्षांपासून तो तुरुंगात असल्याचा उल्लेख करत कामराने त्याचे शब्द लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. उमरने आपल्या लिखाणात म्हटलं आहे की, आज परिस्थिती अशी आहे की त्याचं नाव उमर खालिद असल्यामुळेच त्याला दहशतवादी म्हटलं जात आहे. दूरचित्रवाणीवरील चर्चांमध्ये आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरवलं जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.
उमर खालिदने त्याच्या लिखाणात फेब्रुवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातील एका छोट्या शहरात केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला आहे. या भाषणात त्याने महात्मा गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या विचारांचा उल्लेख केला होता. ‘हिंसेला हिंसेने उत्तर देणार नाही, द्वेषाला द्वेषाने उत्तर देणार नाही. कोणी लाठ्या मारल्या, तर आपण तिरंगा उंच धरू आणि गोळ्या झाडल्या, तर संविधान हातात घेऊ,’ अशा आशयाचे शब्द आपण भाषणात वापरल्याचं त्याने म्हटलं आहे.
View this post on Instagram
दिल्ली पोलिसांनी हे भाषण फेब्रुवारी 2020 मधील दिल्ली दंगलीशी संबंधित कथित मोठ्या कटाचा भाग असल्याचा आरोप केल्याचं उमरने नमूद केलं आहे. मात्र, त्याने स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. यावेळी उमरने भाजप नेते कपिल मिश्रा यांचाही उल्लेख केला आहे. दिल्लीतील हिंसाचारापूर्वी केलेल्या कथित वक्तव्याच्या संदर्भात त्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या आणि इतर राजकीय व्यक्तींच्या बाबतीत वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. दिल्ली दंगलीप्रकरणी उमरवर मोठ्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे. मात्र, त्याने हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
उमरने खटल्याच्या सुनावणीला होणारा विलंब आणि दीर्घकाळ तुरुंगात राहण्याच्या अनुभवावरही भाष्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, दूरचित्रवाणीवरील चर्चांमध्ये त्याच्याबद्दल निर्णय दिल्यासारखी चर्चा होते; परंतु न्यायालयात पुरावे तपासण्याची आणि साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नाही. एखाद्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची संधी न देता दोषी ठरवणं योग्य आहे का, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.
