Laxmikant Berde : मला फाडकन मारली आणि म्हणाला…लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी अभिनेत्याच्या लगावलेली कानशिलात, काय घडलेलं?

Marathi Actor On Laxmikant Berde : विजय पाटकर यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा किस्सा सांगितला होता. लक्ष्मीकांत यांनी एकदा विजय यांच्या कानशिलात लागवलेली. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

Laxmikant Berde : मला फाडकन मारली आणि म्हणाला...लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी अभिनेत्याच्या लगावलेली कानशिलात, काय घडलेलं?
| Updated on: Nov 02, 2026 | 8:54 PM

लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी मनोरंजनविश्वात प्रेमानं ‘लक्ष्या’ म्हणून ओळखलं जायचं. आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. विनोदी भूमिका असो किंवा भावनिक प्रसंग, प्रत्येक भूमिकेत ते जीव ओतून काम करायचे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मैत्री जपण्यासाठी ते कोणतीही गोष्ट करायला तयार असायचे. याच मैत्रीखातर त्यांनी दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या चित्रपटात अवघ्या एका रुपयात काम केल्याचाही किस्सा प्रसिद्ध आहे. मात्र, मैत्री जपणारे लक्ष्मीकांत कामाच्या बाबतीत तितकेच शिस्तप्रिय होते. वेळेवर पोहोचणं आणि काम वेळेत पूर्ण करणं याला ते विशेष महत्त्व द्यायचे. स्वतः वेळ पाळण्याबरोबरच इतरांनीही कामाप्रती प्रामाणिक राहावं, अशी त्यांची अपेक्षा असायची. अभिनेते विजय पाटकर यांनीही एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत घडलेला एक रंजक प्रसंग सांगितला. एकदा उशिरा पोहोचल्यामुळे लक्ष्मीकांत यांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली होती.

 

Loading...

विजय पाटकर यांनी सांगितलेला किस्सा 

विजय पाटकर म्हणालेले की, ‘तेव्हा आम्ही ‘टूरटूर’ आणि ‘उचल बांगडी’ अशी नाटकं करायचो. तेव्हा लक्ष्मीकांत म्हणाला, पाठ्या ११चा शो आहे. त्यावेळी ट्राफिक फारसं नव्हतं. टॅक्सी घेऊन तो उभा असायचा आणि जायचो आम्ही.’

‘एकदा तरी १०:००च्या ऐवजी मी १०:१०ला पोहोचलो होतो. शो ११चा आणि त्यानं १० वाजता ये म्हटलं. १० वाजता टॅक्सी बोलवून तो उभा होता. मी धावत-धावत आलो आणि बसलो. त्यानं फाडकन मारली आणि म्हणाला, तू स्टार झाला काय? मी तुला म्हटलं १० वाजता येईन. तुला प्रॉब्लेम काय आहे? किती नाटकं करतोयस तू? किती काम करतोयस? काय नोकरी करतोयस? का उशिरा आलास? तो पहिला आणि शेवटचा दिवस होता.’ असं विजय यांनी शेवटी म्हटलं. ‘लोकशाही‘ला दिलेल्या मुलाखतीत विजय पाटकर बोलत होते.

 

दरम्यान, विजय पाटकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘हमाल दे धमाल’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us