‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’च्या दिग्दर्शकाला थेट धमक्यांचे फोन, प्रदर्शनाआधीच…प्रकरण काय?

Maharashtra Epstein Files : 'महाराष्ट्र एप्सटिन फाईल्स' या सिनेमाच्या दिग्दर्शकाला धमकीचे फोन येत आहेत. सिनेमातील एका पात्राच्या आडनावरून धमकीचे फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सच्या दिग्दर्शकाला थेट धमक्यांचे फोन, प्रदर्शनाआधीच...प्रकरण काय?
| Updated on: Nov 05, 2026 | 9:18 PM

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या आगामी चित्रपटामुळे सध्या मनोरंजनविश्वासह राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. चित्रपटातील एका पात्राच्या आडनावावरून काही लोक आक्षेप घेत असून चित्रपट थांबवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट समाजप्रबोधनाच्या उद्देशानं बनवण्यात आल्याचं स्वरूप सावंत यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक व्यक्तीचं समाजासाठी काहीतरी योगदान असतं आणि आपण आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, चित्रपटाच्या निमित्तानं सध्या त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही लोकांकडून त्यांना सातत्याने फोन येत असून दिवसाला तब्बल २५ ते ३० फोन येत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारामुळे आपली मानसिक शांतता हरवली असून रात्री झोपही लागत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...

चित्रपटातील ‘थोरात’ आडनावावर आक्षेप

स्वरूप सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील मुख्य पात्राच्या नावासाठी ‘थोरात’ हे आडनाव वापरण्यात आलं आहे. मात्र, या आडनावावरून काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. ‘थोरात’ आडनाव वापरू नका, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. मात्र, चित्रपटाचं काम पूर्ण झाल्यानंतर आता पात्राचं आडनाव बदलणं शक्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या आडनावाच्या मुद्द्यावरून चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राजकीय दबाव असू शकतो, असंही ते म्हणाले.

चित्रपटाच्या कमाईतील काही हिस्सा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी

या चित्रपटातून मिळणाऱ्या नफ्यातील काही टक्के रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचं स्वरूप सावंत यांनी सांगितलं. चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून समाजातील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करणे आणि गरजू लोकांना मदत करणे हा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल, असं कोणतंही काम आपण करणार नसल्याचं दिग्दर्शकांनी स्पष्ट केलं. चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर काही प्रश्न मांडण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. या प्रकरणात राजकीय दबाव असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

‘मला कितीही धमक्या आल्या, तरी हा चित्रपट प्रदर्शित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,’ असा ठाम निर्धार स्वरूप सावंत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबाबत पुढे काय घडणार आणि आडनावावरून सुरू झालेला वाद कोणतं वळण घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us