Brahma Mishra : ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याचा घरात आढळलेला कुजलेला मृतदेह; मृत्यूच्या दोन दिवसांनंतर…नेमकं काय घडलं?

Mirzapur Fame Actor : 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधील अभिनेत्याचा वयाच्या 36व्या वर्षी मृत्यू झाला. अभिनेत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.

Brahma Mishra : मिर्झापूर फेम अभिनेत्याचा घरात आढळलेला कुजलेला मृतदेह; मृत्यूच्या दोन दिवसांनंतर...नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 27, 2026 | 6:56 PM

बॉलिवूड आणि मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. काही कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, तर काहींना यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधीच आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, लोकप्रियता मिळाल्यानंतरही काही कलाकारांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी पद्धतीने झाला. असाच एक धक्कादायक प्रकार अभिनेता ब्रह्मा मिश्रासोबत घडला होता.

36व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

Loading...

ब्रह्मा मिश्राचं पूर्ण नाव ब्रह्मस्वरूप मिश्रा असं होतं. त्याचा जन्म मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झाला होता. अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी मनोरंजनविश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी त्यानं पुण्यातील प्रतिष्ठित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे प्रवेश घेतला. तिथे त्यानं दोन वर्षांचा अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळवण्यासाठी त्यानं मुंबई गाठली. सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिका साकारत त्यानं आपला प्रवास सुरू ठेवला. 2013 मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून त्यानं चित्रपटसृष्टीत काम केलं. त्यानंतर ‘मांझी : द माउंटन मॅन’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘दंगल’, ‘केसरी’ आणि ‘हसीन दिलरुबा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका साकारल्या.

मात्र, त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमुळे. या सीरिजमध्ये त्यानं ललित ही व्यक्तिरेखा साकारली होती. मुन्ना त्रिपाठीचा जवळचा मित्र असलेल्या ललितच्या भूमिकेतून त्यानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्याच्या अभिनयातील सहजता आणि विनोदी अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या भूमिकेमुळे त्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली.

ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूबाबत समोर आलेल्या वृत्तांनुसार, 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्याला छातीत दुखत असल्याचा त्रास झाला होता. त्यानंतर त्यानं डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, याची कोणालाही कल्पना नव्हती. ब्रह्मा मिश्रा मुंबईतील वर्सोवा परिसरातील यारी रोड येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो गेल्या चार वर्षांपासून एकटाच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामुळे त्याची विचारपूस करण्यासाठी किंवा त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी घरात दुसरं कोणीही नव्हतं.

2 डिसेंबर 2021 रोजी ब्रह्मा मिश्रा राहत असलेल्या इमारतीतील शेजाऱ्यांना त्याच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. सुरुवातीला नेमकं काय झालं आहे, हे कोणालाच समजत नव्हतं. मात्र, दुर्गंधी वाढू लागल्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ब्रह्माच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीनं दरवाजा उघडला. घरात प्रवेश केल्यानंतर दुर्गंधी बाथरूममधून येत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. बाथरूममध्ये तपासणी केली असता ब्रह्मा मिश्राचा मृतदेह आढळला.

त्याचा मृतदेह अंशतः कुजलेल्या अवस्थेत होता. अभिनेत्याचा दोन–तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नव्हत्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला.

हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

ब्रह्मा मिश्राच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात घातपाताची शक्यता नसल्याचं सांगितलं होतं. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांनीही हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us