Nana Patekar Passes Away : नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर..नाना पाटेकरांच्या निधनानंतर राज ठाकरेंची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
Nana Patekar Passes Away : "२००० च्या दशकांत गोरे गोमटे आखीव रेखीव गुळगुळीत दिसणाऱ्या नटांच्या ऐवजी कथा ही सिनेमाच्या पटावर आली आणि ती कथा सांगणारे नट आणि प्रेक्षकाला ओढून आणणारे नट यांच्या चलतीचा काळ सुरु झाला. आणि या युगाचे पहिले नायक १००% नाना होते. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला वाट नानांनी करून दिली" असं राज ठाकरे म्हणाले.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचं आज अकाली निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी गोव्यात डोना पावला येथे अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर यांचं अचानक निघून जाणं सर्वांसाठी धक्कादायक आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातून नाना पाटेकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया येत आहेत. नानांचे मित्र आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनानंतर विचार करायला भाग पाडणारी पोस्ट केली आहे.
“ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले”
मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात
“सामान्य माणसाच्या मनात सातत्याने राग, अपमान, शक्तिहीनता, नैराश्य, अनैतिक गोष्टींबद्दलची घृणा, व्यवस्थेबद्दलची निराशा, वर्ग संघर्ष हे सगळं आत धुमसत असतं. ते अगदी कधीतरी किरकोळ भांडणं किंवा घरातील आदळआपट यातून बाहेर पडतं, अन्यथा ते आत धुमसत राहतं. हे धुमसत राहणं, प्रेशर कुकर सारखं आत रटरटत राहणं हेच त्याच्या वाट्याला येतं. नानांच्या अभिनयाकडे बघताना हा सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. आणि मग कधीकधी नाना असतील किंवा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन असतील यांनी पडद्यावर केलेले दोन हात ही माणसाच्या मनाच्या प्रेशर कुकरमधील वाफ बाहेर काढतात. मी जसं नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, किशोर कुमार, रफी साहेब, इत्यादी गायकांनी ,संगीतकारांनी, चित्रपट तसेच नाटक निर्माते,दिग्दर्शक, कलाकारांनी भारतीयांचं किमान ६०/७० वर्ष मन रिझवलं तसंच नाना असतील किंवा बच्चन साहेब असतील यांनी आतली वाफ पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक नाही तर या देशांत दर महिन्याला अराजकता निर्माण झालं असतं” असं राज ठाकरे म्हणाले.
म्हणून ते मोठे कलाकार होते
“नानांच्या अभिनयाकडे बघताना मला नेहमीच हॉलिवूडमधल्या मॉर्गन फ्रीमन यांची आठवण येते. रूप असेल व्यक्तिमत्व असेल दोघेही तत्कालीन बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या कलाकाराच्या पठडीत बसणारे अभिनेते नाहीत. मॉर्गन फ्रीमन यांच्याकडे पाहिल्यानंतर अनेकदा असं वाटतं की या माणसाने काळाच्या ओघात शहाणपण, पेशन्स, आणि आहे हे हे असं आहे हे स्वीकारलेपण आत्मसात केलं आहे. तर नानांच्या अभियाकडे पाहून मला राग, चंचलता, आणि खूप खोल साठलेलं नैराश्य जाणवायचं. या माणसाने खूप बघितलंय असं वाटणारा मॉर्गन फ्रीमन आणि या माणसाने खूप भोगलंय आता बस असं वाटणारे नाना. माणसाची दोन टोकाची रूपं असतात. यातलं दुसरं टोक नाना मनस्वीपणे पडद्यावर आणू शकायचे म्हणून ते मोठे कलाकार होते” असं राज ठाकरे म्हणाले.
नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर…
“पण इतकं सगळं असून देखील त्यांचा स्वभाव मनस्वी होता, मनात येईल ते बोलायचे, फटकळ होता (खरंतर मी कोणाला फटकळ म्हणणं चुकीचंच आहे. असो) यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते दिग्दर्शक टाळायचे, याने नानांचं नुकसान झालं का ? माहित नाही, ते बेफिकीर होते. पण १००% हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांच नुकसान झालं. नवाझउद्दीन सिद्दीकी किंवा इरफान खान( जे आज आपल्यात नाहीत) हे तसे उत्तम कलाकार, परंतु नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर कदाचित या आणि अशा काही कलाकारांना ज्या संधी मिळाल्या त्या मिळाल्या असत्या का, याबद्दल मनात शंका निर्माण होते. नानांनी नुसताच आक्रमक किंवा गंभीर अभिनय केला नाही तर वेलकम चित्रपटातून त्यांनी विनोदी भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे जगाला दाखवले !” असं राज म्हणाले.
असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला
“नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला आहे. त्याचा राग आहे, त्याची अस्वस्थता आहे, त्याचा अपमान आहे, त्याची धडपड आहे आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची अधूनमधून उसळणारी ताकदही आहे. कदाचित म्हणूनच नानांना निरोप देताना केवळ एका मोठ्या अभिनेत्याला आपण निरोप देत नाही आहोत तर समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
