Nana Patekar : चित्रपटात नाना पाटेकरांनी अभिनेत्याला संपवलेलं; खऱ्या आयुष्यात घडली दुर्दैवी घटना, पत्नीनंही धरलेला अबोला
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी 'सिंहासन' सिनेमात जयराम हर्डीकर यांचा खून केलेला. त्यानंतर जयराम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जयराम यांच्या पत्नीनं या दुर्दैवी घटनेला नानांना जबाबदार धरलेलं.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील असाच एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘सिंहासन’. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक दुर्दैवी प्रसंग नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात सांगितला होता.
‘सिंहासन’ चित्रपटाला 44 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते नाना पाटेकर, मोहन आगाशे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटाशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नाना पाटेकर यांनीही चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक प्रसंग सांगितला.
अभिनेत्याच्या निधनानं नाना पाटेकरांना बसला होता धक्का
नाना पाटेकर यांनी सांगितलं की, ‘सिंहासन’ चित्रपटासाठी दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना त्यावेळी तीन हजार रुपये मानधन दिलं होतं. त्या काळात शंभर रुपयांमध्ये चार जणांचं रेशन भरलं जात असल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
मात्र, या चित्रपटाशी संबंधित एक आठवण त्यांच्या मनात आजही कायम आहे. नाना पाटेकर म्हणाले, ‘या चित्रपटात मी जयराम हर्डीकर यांना मारतो. चित्रपटाचं काम संपल्यानंतर लगेचच त्यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांचं निधन झालं.’
जयराम हर्डीकर यांच्या पत्नी अनेक वर्षे नानांशी बोलल्या नव्हत्या
या घटनेनंतर जयराम हर्डीकर यांच्या पत्नी नाना पाटेकर यांच्याशी अनेक वर्षे बोलत नव्हत्या. चित्रपटात नानांनी जयराम हर्डीकर यांना मारल्यामुळेच अपशकुन झाला आणि त्यांच्या पतीचं निधन झालं, अशी भावना जयराम यांच्या पत्नीच्या मनात होती. याबद्दल सांगताना नाना पाटेकर म्हणाले की, जयराम हर्डीकर यांच्या पत्नी कित्येक वर्षे त्यांच्याशी बोलत नव्हत्या. मात्र, अनेक वर्षांनंतर त्यांनी नाना पाटेकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
दरम्यान, ‘सिंहासन’ चित्रपटानंतर नाना पाटेकर यांना अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याच्या संधी मिळाल्या, असंही नानांनी सांगितलेलं.