अरे, हे तर कुठेतरी ऐकलंय! पाकिस्तानमधलं गाणं भारतात प्रचंड व्हायरल; कनेक्शन धक्कादायक
पाकिस्तानमधलं एक गाणं सध्या भारतात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हालाही एका लोकप्रिय बॉलिवूड गाण्याची चाल आठवेल. नेमकं हे कनेक्शन काय आहे, जाणून घेऊयात...

सोशल मीडिया आता कमालच करतो ना. व्हायरल व्हिडिओ, व्हायरल ट्रेंड ही सगळी नवी देणं सोशल मीडियाचीच. फेसबुक इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला एखादी व्यक्ती अमाप पैसे कमवण्याचीही ताकद ठेवते, इतकी ताकद या डिजिटल माध्यमांमुळे निर्माण झालीये आणि हे कोणीही नाकारु शकणार नाही. याच सोशल मीडियाचा वापर अनेक सिने निर्मात्यांनी अगदी अचूकपणे करण्यास सुरुवात केली आहे. पण आता एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होते आहे. त्यामागचे कारण म्हणजे या गाण्याची चाल आपल्याला ओळखीची वाटते. पण जे गाणे व्हायरल झाले आहे ते मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे आणि याच गाण्याच्या चालीवर (धून) भारतातील सुप्रसिद्ध गायक जोडीनेही एक गाणं गायलेलं असून, त्या गाण्यामुळे संबंधित बॉलिवूड सिनेमाही प्रचंड सुपरहिट होता.
छलरे छलरे वाल…
देवीका चौधरी नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये फक्त गिटार या वाद्याच्या सहाय्याने हे गाणं गायलेलं आहे. यावेळी या गाण्याच्या साध्या सादरीकरणाला प्रचंड प्रेम मिळालं आहे. अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यामध्येच एका पाकिस्तानच्या यूजरने लिहिलं की, “हे मूळ गाणे एक पाकिस्तानी ‘सराइकी’ गाणे होते, ज्याची नंतर पंकज उधास यांनी ‘ना कजरे की धार’ या गाण्यासाठी नक्कल केली होती. आमच्या संगीताचे कौतुक केल्याबद्दल आणि ते आवडून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पाकिस्तानकडून प्रेम”, असा दावा त्या यूजरने केला आहे.
भारतातलं सुपरहिट गाणं
दरम्यान, याच चालीवर ‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ हे गाणं आहे. आता हे गाणं पाकिस्तानच्या त्या गाण्यावर बसवलेलं आहे की नाही हे अधिकृतपणे समोर आलेलं नाही. पण या गाण्याचीही प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. गाणं अभिनेता सुनील शेट्टी आणि अभिनेत्री पूनम झावर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. या गाण्याला सिने आणि संगीतप्रेमींकडून प्रचंड प्रेम मिळतं. यामध्ये प्रचंड रोमान्स पाहायला मिळतो.
मोहरा चित्रपटातलं हे गाणं असून विजू शाह यांनी पंकज उधास यांच्याकडून ते गाऊन घेतलेलं आहे. त्यांना साधना सरगम यांनी साथ दिली आहे. तर गाण्याचे बोल इंदीवर यांनी लिहिलेले आहेत. हे गाणं मूळचं कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. पण ते गाणं कधीही कुठेही आलेलं नव्हतं. पण नंतर ते दिग्दर्शक विजू शाह यांच्या प्रयत्नामुळे मोहरामध्ये आलं. मोहरा हा सिनेमा 1994 साली प्रदर्शित झालेला एक सुपरडुपरहिट सिनेमा आहे.
(महत्त्वाचं: बॉलिवूड सिनेमा ‘मोहरा’मधील ‘ना कजरे की धार’ हे गाणे पाकिस्तानच्या ‘छलरे छलरे वाल’ गाण्याच्या चालीवरुन बनवलं असल्याचा कोणताही दावा टीव्ही९ मराठी करत नाही.)