तुमचीच खिल्ली उडवली ! जेनिफर विंगेटसोबतच्या वादाच्या चर्चांवर परिणीती चोप्रा संतापली, फेक न्यूज पसरवणाऱ्यांना सणसणीत टोला
'शक: ट्रस्ट नो वन' या वेबसीरिजच्या पार्टीमधील व्हायरल व्हिडीओनंतर परिणिती चोप्रा आणि जेनिफर विंगेट यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडियावर या मुद्यावरून बरच काही उलट-सुलट बोललं गेलं. आता परिणीतीने लांबलचक पोस्ट करत बाजू स्पष्ट केली आणि ट्रोलर्सनाही चोख प्रत्युत्तर दिलं.

‘शक’ या वेबसीरिजचं यश साजरी करणारी बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि टीव्ही-ओटीटी स्टार जेनिफर विंगेट यांच्यातील कोल्ड वॉरच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत. या दोन्ही अभिनेत्रींमध्ये तणाव असून काहीही आलबेल नाही, असा दावा सक्सेस पार्टीतील एक व्हिडीओ समोर आल्यावर करण्यात आला. परिणितीने जेनिफरकडे इग्नोर केलं, अशाही चर्चा सुरू झाल्या. मात्र आता य सगळ्या चर्चा, अटकळींना पूर्णविराम देत परिणिती आणि जेनिफर विगेंट दोघींनीही अफवा पसरवणाऱ्या आणि स्वार्थी कंटेंट मेकर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
परिणिती चोप्राने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक, सविस्तर पोस्ट शेअर करत फेक न्यूज पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. “ जेनी (जेनिफर) आणि मी गेल्या दोन दिवसांपासून स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या काही लोकांनी तयार केलेले ‘क्रिएटिव्ह’ व्हिडिओ पाहत आहोत. आणि अंदाज लावा, काय झालं? उलट तुमचीच खिल्ली उडवली आहे, कारण हे व्हिडिओ पाहून आम्ही दोघीही अक्षरशः हसून हसून लोटपोट होत आहोत.” असं परिणितीने लिहीलं. “ तुमच्या निराधार आणि मनाने रचलेल्या कथा तुम्हालाच मूर्ख ठरवत आहेत. जेनी नेहमीच माझी आवडती व्यक्ती राहिली आहे आणि यापुढेही राहील.” सोशल मीडियावर तर्कवितर्क लावणाऱ्यांना लक्ष्य करत परिणितीने असं पुढे लिहीलं.
काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी वाद निर्माण करणाऱ्यांना परिणितीने चांगलंच सुनावलं. “ प्रसिद्धी मिळवण्यासाठी खोटे वाद निर्माण करणाऱ्यांनो, तुमच्या आयुष्यात काहीतरी कामाचे करण्याचा प्रयत्न कराल का? पण आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला एका मोठ्या हास्याची खरंच गरज होती ” असं तिने लिहीलं.
जेनिफरने आधीच मांडली बाजू
परिणीतीच्या आधी जेनिफर विंगेटनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. “त्यावेळी स्टेजवर पुरेशी जागा नसल्यामुळे मी फक्त थोडी मागे सरकले होते. परिणीती नेहमीच माझ्याशी अतिशय प्रेमाने वागली आहे. आमच्यात प्रेमाशिवाय दुसरे काहीही नाही. कृपया द्वेष पसरवणे थांबवा आणि या घटनेला असे वेगळे वळण देऊ नका, जे प्रत्यक्षात मुळीच नाही ” असं जेनिफरने व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य स्पष्ट करत लिहीलं.
कसा सुरू झाला वाद ?
खरं तर, नेटफ्लिक्सवरील ‘शक’ या सीरिजच्या भव्य यशाच्या पार्टीदरम्यानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देताना जेनिफर विंगेट थोडी मागे सरकताना दिसली. या क्षणाचा सोशल मीडिया युजर्सनी आणि काही सोशल मीडिया पेजेसनी चुकीचा अर्थ लावला. परिणीतीने जेनिफरकडे दुर्लक्ष केलं आणि दोघींमध्ये सर्व काही ठीक नाही, असा दावा यानंतर करण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चांना उधाण आले. मात्र, परिणीती आणि जेनिफर या दोघींनीही दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या अफवा त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण करू शकत नाहीत, हेही या दोघींनी दाखवून दिलं.