मुलांना शिकवा की, मुलींचं शॉर्ट्सवर फिरणंही नॉर्मल..; अभिनेत्री प्राजक्ता स्पष्टच बोलली

समाजात समानतेसाठी अनेक आंदोलनं आणि चर्चा होत असताना लिंगभेदाचा मुद्दाही गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे, असं प्राजक्ताला वाटतं. मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी वेगवेगळे नियम बनवण्याऐवजी दोघांनाही समान संधी आणि स्वातंत्र्य मिळालं पाहिजे.

मुलांना शिकवा की, मुलींचं शॉर्ट्सवर फिरणंही नॉर्मल..; अभिनेत्री प्राजक्ता स्पष्टच बोलली
Prajakta Hanamghar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 26, 2026 | 9:41 AM

समाजात स्त्री-पुरुष समानतेची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. महिलांना समान अधिकार मिळावेत, त्यांच्यावर लादलेली बंधनं दूर व्हावीत आणि प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार जगता यावं, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ही समानता केवळ महिलांना स्वातंत्र्य देण्यापुरती मर्यादित न राहता मुलांच्या संगोपनापासूनच रुजवली गेली पाहिजे, असं मत अभिनेत्री प्राजक्ता हनमघरने व्यक्त केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने मुलांना लिंगभेदमुक्त पद्धतीने वाढवण्याची गरज अधोरेखित केली. तिच्या या स्पष्ट मतांची सध्या चर्चा होत आहे. प्राजक्ता हनमघरच्या मते, मुलांच्या संगोपनात आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. विशेषतः मुलांमध्ये स्त्रियांविषयी समानतेची भावना रुजवण्यासाठी आईचा सहभाग अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. मुलींना संध्याकाळी सात वाजल्यानंतर घराबाहेर राहण्यावरून प्रश्न विचारले जातात, त्याचप्रमाणे मुलांनाही ते कुठे आहेत आणि काय करत आहेत, याबाबत विचारलं पाहिजे.

‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, “मला असं वाटतं की मुलांच्या आईचा सहभाग अधिक अपेक्षित आहे. मुलींना तर सांगतच आहात ना तुम्ही की, सात वाजता घरी ये. मग मुलांनाही विचारा 7 नंतर तू काय करतोय? मुलींना सांगतच आहात ना तुम्ही की, तू असे कपडे घातलेस म्हणून तसं झालं. मग मुलांनाही सांगा की हे नॉर्मल आहे. तू शॉर्ट्सवर फिरतो हे नॉर्मल आहे तर तीसुद्धा शॉर्ट्सवर फिरते, हेही नॉर्मल आहे. तुझ्या जशा वेगळ्या चॉइसेस असू शकतात, तशा मुली म्हणून तिच्याही वेगळ्या चॉइसेस असू शकतात. माझ्या मते, ही मुलांच्या आईची जबाबदारी अधिक वाटते की या पद्धतीने तुम्ही मुलं वाढवली पाहिजेत. कुठलंही काम हे लिंगाधारित नसलं पाहिजे.”

Loading...

पहा व्हिडीओ-

घरातील कामांची विभागणी हा स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक कुटुंबांमध्ये स्वयंपाक करणं आणि घर सांभाळणं ही प्रामुख्याने महिलांची जबाबदारी मानली जाते. मात्र, प्राजक्ता हनमघरने या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित केला आहे. “स्वयंपाक करणं हे कौशल्य आहे, ते जगातल्या सगळ्यांना आलं पाहिजे, या मताची मी आहे. किंवा नाही आलं तर ते कुणालाही नाही आलं तर चाललं पाहिजे. मुलाला नाही आलं तर चालतंय, पण मुलीला नाही आलं तर चालत नाही, असं नाही पाहिजे. आपण सध्या इतकी आंदोलनं करतच आहोत, इतक्या गोष्टींवर उहापोह करतोच आहोत, तर त्यात समानता ही गोष्ट लिंग या दृष्टीनेसुद्धा विचारात आणुयात. खऱ्या अर्थाने लिंगरहित समाज म्हणून आपण जगुयात. ते जास्त सोपं आणि जास्त आनंददायी आहे, असं मला वाटतं,” असं स्पष्ट मत तिने मांडलं.

लहानपणापासूनच मुलांना समानतेची शिकवण दिल्यास भविष्यात अधिक संवेदनशील आणि समताधिष्ठित समाज घडण्यास मदत होऊ शकते. लिंगभेदमुक्त समाजात कोणत्याही कामाकडे स्त्री किंवा पुरुष म्हणून पाहिलं जाणार नाही. असा समाज अधिक सोपा आणि आनंददायी असेल, असा विश्वास प्राजक्ता हनमघरने व्यक्त केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us