मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, आता ती फक्त जोक… नव्या विधानाने पेटणार वाद ?

राजीव मसंद यांनी कंगना रानौतच्या अभिनयाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांना अभिनेत्री कंगनाची आठवण येते, सध्याचे राजकीय व्यक्तिमत्व तिच्या अभिनयावर प्रभावी ठरले आहे, असे ते म्हणाले. 'क्वीन'मधील तिच्या अभिनयाचे कौतुक करताना, जुन्या कंगनाला पडद्यावर परत येण्याची आशाही मसंद यांनी व्यक्त केली. कंगनाच्या दाव्यांवरही त्यांनी मत मांडले, ज्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे.

मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते, आता ती फक्त जोक... नव्या विधानाने पेटणार वाद ?
| Updated on: Sep 29, 2026 | 4:07 PM

बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींचा विषय सुरू असेल तर कंगना रानौतचं (Kangana Ranaut) नाव हमखास ओठी येतंच. अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या कंगना ही अभिनय कारकिर्दीनंतर आता राजकारणातही सक्रिय झाली आहे. दरम्यान माजी चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी कंगनाच्या अभिनयाबाबत भाष्य केलं असून आपल्याला तिची ‘अभिनेत्री’ म्हणून आठवण येते, असं म्हटलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये राजीव मसंद यांनी कंगनाच्या सध्याच्या व्यक्तिमत्वावर भाष्य केलं. राजकारणात प्रवेश केल्यावर तिची राजकीय ओळख तिच्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वावर अधिक प्रभावी ठरली, असं त्यांचं म्हणणं आहे. ‘शार्दुलॉजी’ या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत राजीव मसंद यांनी कंगनाबद्दल बोलताना तिच्या अभिनयाची आठवण येत असल्याचं सांगितलं. “ मला अभिनेत्री कंगनाची आठवण येते. आता ती केवळ एक जोक बनली आहे.” असं ते म्हणाले. एवढंच नव्हे तर, बॉलिवूडमधील मोठ्या लोकांनी आपल्याला कामाच्या संधी दिल्या नाहीत, असा दावा कंगनाने वारंवार केला आहे, त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. त्यांच्या य विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यताआहे. य़ावर आता कंगना काय उत्तर देते, याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

राजीव मसंद यांच्या मते, एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती ऐकायला चांगली वाटू शकते, पण आपण कंगनाच्या दाव्याशी पूर्णपणे सहमत नाही, असं ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बॉलिवूडमध्ये यशाला महत्व दिलं जातं. अनेक कलाकारांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागतो, पण यश मिळाल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असं त्यांनी नमूद केलं.

Loading...

कंगनाच्या अभिनयाचं कौतुक

2014 साली विकास बहल याच्या ‘क्वीन’ चित्रपटातील कंगनाच्या अभिनयांच राजीव यांनी विशेष उल्लेख केला. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचं कौतुक करत, तिची कामगिरी शानदार होती, असं त्यांनी म्हटलं. कंगना आणि विकास बहल पुन्हा एकदा ‘क्वीन 2’च्या माध्यमातून एकत्र येत असल्याबद्दलही राजीव मसंद उत्सुक दिसून आले. ‘ एखाद्या चांगल्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी कंगना जेव्हा झोकून देते ना, तेव्हा तिने नेहमीच शानदार अभिनय केलाय. मात्र, पुढील काळात कंगनाच्या चित्रपटांमध्ये तिच्या व्यक्तिरेखेपेक्षा तिचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व हेच अधिक ठळकपणे जाणवलं’ असं राजीव मसंद म्हणाले.

ती व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस व्हायची

राजीव मसंद यांनी कंगनाच्या जुन्या अभिनयशैलीचीही आठवण करून दिली. त्यांच्या मते, कंगना जेव्हा एखादी भूमिका साकारायची, तेव्हा ती त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस व्हायची. त्या काळात पडद्यावर कंगना अभिनेत्री म्हणून दिसत नव्हती, तर ती साकारत असलेली व्यक्तिरेखाच प्रेक्षकांसमोर ठळकपणे दिसायची, असं राजीव यांनी सांगितले. मात्र आताही कंगनाबाबतच्या आपल्या अपेक्षा संपलेल्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यात कंगना पुन्हा तिच्या अभिनयाच्या जुन्या टप्प्यावर परतू शकते, अशी आसाही त्यांनी व्यक्त केली.

कंगना आणि राजीव यांच्यातील मतभेद

कंगना रनौत आणि राजीव मसंद यांच्यातील वाद बराच जुना आहे. राजीव मसदं यांच्या चर्चित ‘ ॲक्ट्रेस राउंडटेबल’मध्ये आपल्याला आमंत्रित का केलं नाही, असा सवाल कंगनाने विचारला होता, त्यानंतर त्यांच्यातील वाद सुरू झाला. चित्रपट निर्माता करण जोहर यांच्याशी राजीव यांची जवळीक असल्यामुळे माझ्याशी पक्षपातीपणे करण्यात आला असा आरोप कंगनाने केला. बॉलिवूडमधील नेपोटिझम अर्थात घराणेशाहीच्या मुद्द्यावर कंगनाने बऱ्याच काळापासून प्रश्न उपस्थित केला आहे. 2018 साली तिने करण जोहरला ‘फ्लॅग बेअरर ऑफ नेपोटिझमर’ म्हणत टीका केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us