Ramayana : त्यांना रस्त्यावरच्या भुंकणाऱ्या कुत्र्यासारखं समजा…’रामायण’ चित्रपटावर राम गोपाल वर्मांचं परखड भाष्य
Ram Gopal Varma On Ramayana : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी 'रामायण' सिनेमाबद्दल भाष्य केलं असून सिनेमावर टीका करणाऱ्यांना सुनावलं आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच काही समीक्षकांनी त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं असून टीका करणाऱ्यांना आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. नकारात्मक टीकाकारांची तुलना त्यांनी थेट रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांशी केली आहे.
राम गोपाल वर्मा यांची पोस्ट
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ”रामायण’ हा फक्त एक भक्तिमय चित्रपट नाही, तर ती एक भक्तीची शक्ती आहे. यातील नायक हा कथेपेक्षा मोठा कोणताही निळ्या रंगाचा देव दाखवलेला नाही, तर तो असा माणूस आहे, ज्यानं जगाचा अंत आधीच पाहिला आहे आणि तरीही तो स्वतःच्या इच्छेनं त्या जगात पाऊल ठेवतो. हा विजय एखाद्या राज्याचा नसून अशक्तपणाला आव्हान देणाऱ्या विचारांचा आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम जुने नियम मोडून फक्त शक्तीच्या आणि सत्याच्या नियमांवर चालणाऱ्या माणसाची जाणीव करून देते. यातील हिंसाचार फक्त दाखवण्यापुरता नाही, तर तो परिणामांची स्पष्टता दर्शवतो. हा चित्रपट इतर सर्व चित्रपटांपेक्षा वेगळा ठरतो, कारण जिथे बरेच चित्रपट पुढे सरकवले जात नाहीत, तिथे हा चित्रपट सहज पुढे जातो. यात उगाचच स्पष्टीकरण दिलेलं नाही, म्हणूनच तो आधी आलेल्या इतर चित्रपटापेक्षा जास्त प्रभावी ठरतो. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही फक्त एक कथा पाहून बाहेर पडत नाही, तर एक मोठा अनुभव जगून बाहेर पडता.’
‘सीता हरणानंतरच्या एका सीनमध्ये जेव्हा रणबीर रिकाम्या आश्रमात उभा राहून सीता जिथे होती त्या जागेकडे पाहतो, तेव्हा कॅमेरा त्याच्यावर बराच वेळ टिकून राहतो. त्यावरून स्पष्ट दिसतं की, त्याचं दुःख आता एका ठोस निर्णयात बदललं आहे.’
याबद्दल बोलताना राम म्हणाले की, ‘यश हा फक्त विरोधक किंवा व्हिलन वाटत नाही. तो अशा विचारांचे प्रतिनिधित्व करतो जे नष्ट होणार आहे. शेवटच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये, जेव्हा तो राम यांच्याशी सैन्याशिवाय मोकळ्या मैदानात बोलतो, तेव्हा तो आपला आवाज वाढवत नाही. तो फक्त त्याची व्हॅल्यू सांगतो. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही.’
‘जटायूच्या भूमिकेत अनुपम खेर पुष्पक विमान अडवताना जटायूचं कृत्य हे फक्त निष्ठेचं प्रदर्शन नाही. पंख अर्धे तुटलेले, रक्ताने माखलेले असतानाही तो लढत राहतो, कारण शरीराची साथ सुटली तरी त्याच्या मनातील जिद्द संपलेली नसते. जेव्हा तो खाली पडतो, तेव्हा कॅमेरा त्याच्या चेहऱ्यावरच राहतो. तिथे कोणताही गोंधळ नाही, त्याच्या डोळ्यांत तीच लढण्याची भाषा दिसते. हे फक्त बलिदान नाही, तर तो असा माणूस आहे ज्याला समजलंय की, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत लढत राहणं हाच एकमेव पर्याय आहे. शेवटी मला या महान चित्रपटासाठी एकत्र आलेल्या सर्व दिग्गज कलाकारांना एवढंच सांगायचंय की, तुम्ही सर्वांनी ही अद्भूत कलाकृती बनवण्यासाठी जे हत्तीसारखे अफाट प्रयत्न केले आहेत, त्यासमोर कोणत्याही नकारात्मक टीकाकारांच्या टीकेला रस्त्यावरील भुकणाऱ्या कुत्र्यांसारखं समजा’ असं राम गोपाल वर्मा शेवटी म्हणाले.