रश्मिका मंदाना – विजय देवरकोंडा अडकले लग्नबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या आयुष्याची एक नवी सुरुवात केली आहे. उदयपूरमध्ये अत्यंत धूमधडाक्यात या दोघांचं लग्न पार पडलं आहे. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

रश्मिका मंदाना - विजय देवरकोंडा अडकले लग्नबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Rashmika Mandanna and Vijay Deverakonda
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2026 | 10:49 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरमध्ये सकाळी 10.10 वाजता हिंदू परंपरेनुसार या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि काही मोजके पाहुणे उपस्थित होते. वैदिक मंत्र आणि वाद्यांच्या गजरात विजयने रश्मिकाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. यावेळी नववधू म्हणून रश्मिका अत्यंत सुंदर दिसत होती. दुपारी 4.30 वाजता कोडाव परंपरेनुसार दोघं पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. विजय आणि रश्मिका यांनी पती-पत्नी म्हणून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो अद्याप समोर आले नाहीत. परंतु हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे विविध फोटो विजय आणि रश्मिका त्यांच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर करत आहेत.

‘गीता गोविंदम’, ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं आहे. ‘गीता गोविंदम’ हा त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘डिअर कॉम्रेड’मध्येही स्क्रीन शेअर केला. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं गुपचूप एकमेकांना डेट करत होते. आपल्या रिलेशनशिपविषयी दोघांनीही कमालीची गुप्तता पाळली होती. अखेर लग्नाच्या काही दिवस आधी विजयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली.

‘वेडिंग ऑफ VIROSH’ असं त्यांनी या लग्नाला नाव दिलं आहे. उदयपूरमधील अरावलीमध्ये आयटीसी हॉटेल्स द मोमेंटोसमध्ये हा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. रश्मिका मंदानाचे होणारे सासरे म्हणजेच विजय देवरकोंडाचे वडील गोवर्धन रावसुद्धा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी अनेक टीव्ही शोजचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय विजयच्या वडिलांनी 2021 मध्ये त्यांच्या मुलासोबत ‘पुष्पक विमानम’ या चित्रपटाचीही निर्मिती केली होती. तर रश्मिकाची होणारी सासू आणि विजयची आई माधवी देवरकोंडा या गृहिणी आहेत. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. आपल्या दोन्ही मुलांसोबत ते सतत फोटो शेअर करत असतात. विजयला एक छोटा भाऊसुद्धा आहे, त्याचं नाव आनंद देवरकोंडा आहे. रश्मिका मंदानाचा होणारा दीर आनंदसुद्धा मोठ्या भावाप्रमाणेच अभिनेता आहे. तेलुगू सिनेसृष्टीत तो आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय.