उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नात वेटर बनता पण..; मुश्ताक खान यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड स्टार्स गैरहजर, रझा मुराद संतापले

मुश्ताक खान यांच्या अंत्यविधीला एकही मोठा कलाकार उपस्थित राहिला नाही, याची खंत ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी व्यक्त केली. ज्या कलाकाराने आपल्या आयुष्याची 50 वर्षे दिली, त्या कलाकारासाठी 50 मिनिटंही तुम्हाला काढता आले नाही, असा राग त्यांनी व्यक्त केला.

उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नात वेटर बनता पण..; मुश्ताक खान यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड स्टार्स गैरहजर, रझा मुराद संतापले
Raza Murad and Mushtaq Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 27, 2026 | 11:15 AM

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील त्यांच्या सहकलाकारांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मात्र, त्यांच्या अंत्यसंस्काराला इंडस्ट्रीतील काही मोठे कलाकार उपस्थित न राहिल्याने ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुश्ताक खान यांच्या अंत्यसंस्कारानंतर रझा मुराद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडमधील मोठ्या नावांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. मुश्ताक खान यांचं 24 सप्टेंबर 2026 रोजी निधन झालं. 25 सप्टेंबर रोजी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजपाल यादव, संजय मिश्रा, रजत बेदी, अन्नू कपूर, मनीष वाधवा, सुनील पाल, शहजाद खान, झैद दरबार आणि दिग्दर्शक अनीस बाज्मी यांच्यासह अनेक कलाकार आणि सहकारी उपस्थित होते.

“उद्योगपतीच्या मुलाचं लग्न असेल तर..”

रझा मुराद यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, मुश्ताक खान यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी त्यांना अखेरचा निरोप दिला, पण इंडस्ट्रीतील कोणताही मोठा स्टार त्यांच्या अंत्यसंस्काराला दिसला नाही. त्यांच्या मते, जवळपास पाच दशकं हिंदी चित्रपटसृष्टीला देणाऱ्या कलाकारासाठी किमान काही वेळ काढता आला असता. रझा मुराद यांनी कोणत्याही कलाकाराचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी त्यांच्या वक्तव्यात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित केला. एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न असेल किंवा राजकीय कार्यक्रम असेल, तर अनेक सेलिब्रिटी तिथे आवर्जून उपस्थित राहतात; मात्र सहकलाकाराच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

इंडस्ट्रीतल्या कलाकारांवर व्यक्त केला राग

“पण खंत याची आहे की अशावेळी, कोणताही स्टार ज्याला आपण स्टार म्हणतो, तो अंत्यदर्शनाला आला नाही. त्यांचे बरेच मित्र, सहकलाकार, कलाकार इथे आले होते. पण कोणताच मोठा चेहरा त्यात दिसला नाही. पण जर हे एखाद्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न असतं, तर ते केवळ आलेच नसते, तर वेटर असल्यासारखे लग्नातल्या पाहुण्यांची सेवाही केली असती. किंवा जर एखाद्या राजकीय पक्षाला त्यांच्या उपस्थितीची आवश्यकता असेल, तर ते नक्कीच तिथे हजर राहिले असते. पण ज्या माणसाने आपल्या आयुष्याची 50 वर्षे चित्रपटसृष्टीला दिली, त्यांना त्यांनी अखेरचा निरोपही दिला नाही. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे. तरीही तुम्ही त्यांना 50 मिनिटंही देऊ शकत नाही. मुश्ताक खान हे कोणाचीही खुशामती न करता स्वत:च्या कर्तृत्त्वावर मोठे बनले”, अशा शब्दांत रझा मुराद यांनी नाराजी बोलून दाखवली.

रझा मुराद यांनी त्यांच्या व्हिडीओच्या शेवटी प्रसिद्धी, पैसा आणि स्टारडमच्या क्षणभंगुरतेबद्दलही भाष्य केलं. आज ज्यांच्याकडे नाव आणि प्रसिद्धी आहे, ती कायमची राहणार नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे कलाकारांनी आपल्या सहकाऱ्यांच्या योगदानाची आणि नात्यांची कदर करावी, असं त्यांनी सूचित केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us