4 सप्टेंबरला शूटिंग, अन् 10 दिवसांत सगळंच बदललं; मुश्ताक खान यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल लेकाचा भावूक खुलासा
Mushtaq Khan: फुफ्फुसाचा कर्करोग असूनही मुश्ताक खान यांनी 4 सप्टेंबरपर्यंत शूटिंग सुरू ठेवलं होतं. गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून ते आजारी होते. 4 सप्टेंबर रोजी त्यांनी शूटिंग केलं होतं.

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. 24 सप्टेंबर रोजी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाशी लढा देत होते. मात्र, आजारपणातही त्यांनी काम सुरूच ठेवलं होतं. त्यांच्या निधनानंतर मुलगा मोहसिन खानने वडिलांच्या शेवटच्या दिवसांबाबत अनेक भावूक आठवणी सांगितल्या आहेत. मोहसिन खानने सांगितलं की, मुश्ताक खान यांनी 4 सप्टेंबरपर्यंत शूटिंग केलं होतं. मुंबईतील मढ आयलंड इथं त्यांच्या शेवटच्या शूटिंगपैकी एक पार पडलं. ते सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा यांचा मुलगा अबीर सिंहच्या पदार्पणाच्या ‘टार्झन’ या चित्रपटासाठी काम करत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी रजत बेदी, चंकी पांडे आणि राजपाल यादव यांच्यासोबत काम केलं होतं.
मोहसिनने पुढे म्हटलं, वडिलांची तब्येत गेल्या वर्षभरापासून ठीक नव्हती आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीला उपचारांना चांगला प्रतिसादही मिळत होता. मात्र, निधनाच्या आधीच्या सुमारे दहा दिवसांत त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. रुग्णालयात दाखल असतानाही मुश्ताक खान यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, अशी आठवण मोहसिनने सांगितली. “त्यांनी हसत-हसत जगाचा निरोप घेतला,” अशा शब्दांत त्याने वडिलांच्या शेवटच्या क्षणांचं वर्णन केलं.
मुश्ताक खान यांच्या काही प्रोजेक्टचं काम त्यांच्या निधनानंतरही प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांचा तेलुगू चित्रपट ‘दादा’ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय मोहसिनच्या हिंदी-मराठी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असलं तरी मुश्ताक खान यांचं डबिंग पूर्ण होऊ शकलं नाही. हा चित्रपट त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल, असं मोहसिनने सांगितलं.
मुश्ताक खान यांनी तब्बल 51 वर्षांचा अभिनय प्रवास केला. ‘हम हैं राही प्यार के’, ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘वेलकम’, ‘अंदाज अपना अपना’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. ‘वेलकम’मधील बल्लूची भूमिका विशेष गाजली. त्यांच्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्स, तसंच 1000हून अधिक टीव्ही एपिसोड्सचा समावेश असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं.
