Renuka Shahane: आई-वडिलांचा घटस्फोट, लोकांचे टोमणे अन् शिक्षकांकडूनही वाईट वागणूक; रेणुका शहाणे यांनी सांगितला कटू अनुभव

Renuka Shahane: रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांना शौर्यमान आणि सत्येंद्र अशी दोन मुलं आहेत. दोघांनीही आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबत कुटुंबाला महत्त्व दिलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारत असतानाही त्यांचं नातं चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतं.

Renuka Shahane: आई-वडिलांचा घटस्फोट, लोकांचे टोमणे अन् शिक्षकांकडूनही वाईट वागणूक; रेणुका शहाणे यांनी सांगितला कटू अनुभव
Renuka Shahane
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 18, 2026 | 10:20 AM

Renuka Shahane: ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा होते. अभिनेता आशुतोष राणा यांच्यासोबत त्यांचा सुखी संसार सुरू आहे. मात्र, आशुतोष यांच्याशी लग्न करण्यापूर्वी रेणुका यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले होते. पहिलं लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा प्रेमात पडण्याचा अनुभव त्यांनी एका मुलाखतीत मोकळेपणाने सांगितला होता. पहिल्या लग्नातून मिळालेल्या अनुभवामुळे लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आणि आशुतोष राणा यांच्या प्रेमात त्या कशा पडल्या, याविषयी त्यांनी महत्त्वाचे खुलासे केले होते.

रेणुका शहाणे यांचं पहिलं लग्न मराठी नाटककार आणि लेखक विजय केंकरे यांच्याशी झालं होतं. मात्र, पती-पत्नी म्हणून त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. एका मुलाखतीत पहिल्या लग्नाबद्दल बोलताना रेणुका यांनी सांगितलं की, दोघंही चांगल्या व्यक्ती असूनही पती-पत्नी म्हणून त्यांचं नातं यशस्वी होऊ शकलं नाही. नातं टिकवण्याची इच्छा असतानाही ते शक्य झालं नाही, तर अशा परिस्थितीत परस्पर संमतीने वेगळं होणं आणि त्या अनुभवातून शिकणं महत्त्वाचं असतं, अशी त्यांची भूमिका होती. पहिल्या लग्नाकडे केवळ अपयश म्हणून न पाहता त्यातून मिळालेल्या शिकवणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loading...

आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बालपणावर परिणाम

रेणुका यांच्या आयुष्यातील संघर्ष केवळ पहिल्या लग्नापुरता मर्यादित नव्हता. त्या लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. याचा त्यांच्या बालमनावर मोठा परिणाम झाला. आई-वडील विभक्त झाल्यामुळे त्यांना अनेकदा लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला. काही मुलांना त्यांच्यासोबत खेळू नका, कारण ती विभक्त कुटुंबातून आली आहेत, असं सांगितलं जात असे. अगदी शिक्षकांकडूनही त्यांना वाईट वागणूक मिळाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला होता.या अनुभवांमुळे सुरुवातीच्या काळात प्रत्येकाला खूश ठेवण्याचा प्रयत्न आपण करत होतो, असं रेणुका यांनी स्पष्ट केलं.

पहिल्या लग्नानंतर बराच काळ गेल्यावर रेणुका शहाणे यांच्या आयुष्यात आशुतोष राणा यांचं आगमन झालं. पुन्हा प्रेमात पडताना लग्नाबद्दलची आपली कल्पना पूर्वीसारखी राहिली नव्हती, असं त्यांनी सांगितलं. पहिल्या लग्नातून मिळालेल्या अनुभवामुळे नात्यातील चढ-उतारांना सामोरं जाण्यासाठी आपण अधिक तयार झालो होतो, असं त्या म्हणाल्या. आशुतोष यांच्याशी लग्न केलं तेव्हा रेणुका 34-35 वर्षांच्या होत्या. तोपर्यंत त्यांची भावनिक परिपक्वता वाढली होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी अधिक वास्तववादी दृष्टिकोनातून हाताळता आल्या. पहिल्या लग्नाच्या अनुभवातून त्यांना खूप काही शिकायला मिळालं आणि त्याचा फायदा दुसऱ्या नात्यात झाला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us