मराठी-हिंदीच्या वादावर रेणुका शहाणेच्या पतीची मार्मिक प्रतिक्रिया
मराठी-हिंदी भाषेच्या वादावर आता अभिनेते आशुतोष राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका कार्यक्रमात त्यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी पत्नी रेणुका शहाणेचाही उल्लेख केला.

राज्यात मराठी बोलण्यावरून मोठा वाद सुरू आहे. या वादाला राजकीय वळणसुद्धा मिळालं. एकीकडे मराठी बोलण्यावरून एका रेस्टॉरंटच्या मालकाला मारण्यात आलं. तर दुसरीकडे हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. अखेर शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाला. यानंतरही मराठी-हिंदी भाषेवरून विविध प्रतिक्रिया समोर आल्या. आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आशुतोष राणा यांनी त्यावर अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांना भाषेच्या वादावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “भाषा ही नेहमीच संवादाचा विषय असते, वादाचा नाही.”
काय म्हणाले आशुतोष राणा?
माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या बायकोची मातृभाषा मराठी आहे, असं त्यांनी आधी मराठीत उत्तर दिलं. त्यानंतर ते पुढे म्हणाले, “मी असं मानतो की भाषा ही नेहमीच संवादाचा विषय असते. ती कधीच वादाचा विषय नसते. भारत हा इतका परिपक्व आणि अद्भुत देश आहे, जिथे सर्व गोष्टी स्वीकारल्या जातात. भारताचा विश्वास संवादावर आहे, वादावर नाही.”
हिंदी-मराठी भाषा वाद
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद चर्चेत आहे. त्यावरून राजकीय गोंधळ सुरू आहे. राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती करण्यात आल्यानंतर हिंदीविरोधात वाद पेटला. इयत्ता पाचवी किंवा सहावीनंतर येणारा हिंदी भाषेचा विषय पहिलीपासूनच शिकवण्याला विरोधी पक्षांनी विरोध केला. त्यानंतर शासनाने हा निर्णय मागे घेतला. तरीही भाषेवरून सध्या वाद सुरूच आहे. यावर अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी भाषा आलीच पाहिजे किंवा किमान आम्ही शिकून घेऊ, अशी इच्छाशक्ती तरी दाखवली पाहिजे, अशा प्रतिक्रिया काहींनी दिल्या.
आशुतोष राणा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ते मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे पती आहेत. 2001 मध्ये या दोघांनी लग्न केलं. या दोघांना शौर्यमान आणि सत्येंद्र ही दोन मुलं आहेत.
