
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री लता सबरवालने काही दिवसांपूर्वी पती संजीव सेठशी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं होतं. या दोघांनी ‘ये रिश्ता..’ मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2010 मध्ये लता आणि संजीव यांनी लग्नगाठ बांधली आणि आता लग्नाच्या 15 वर्षांनंतर ते विभक्त झाले. संजीव सेठ हा मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसचा पूर्व पती आहे. एका जुन्या मुलाखतीत रेशमने संजीवला घटस्फोट दिल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला होता. रेशम आणि संजीव यांनी 1993 मध्ये एकमेकांशी लग्न केलं होतं. या दोघांना ऋषिका ही मुलगी आणि मानव हा मुलगा आहे. विशेष म्हणजे रेशमला घटस्फोट दिल्यानंतर लताशी लग्न करण्यापूर्वी संजीवने त्याच्या दोन्ही मुलांची परवानगी घेतली होती.
संजीव आणि रेशम यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला होता. ई टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत रेशम म्हणाली होती, “मला माझ्या घटस्फोटाचा पश्चात्ताप होतो. कारण जेव्हा माझं लग्न झालं होतं, तेव्हा मी फक्त 20 वर्षांची होती. त्यानंतर मी लगेच आई झाली. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळण्याइतकी सक्षम आणि समजूतदार मी त्यावेळी नव्हते. संजीव आणि माझ्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. आम्हा दोघांना वाटतं की त्यावेळी जर आम्ही मॅच्युअर असतो तर आमचा घटस्फोट कधीच झाला नसता.”
पूर्व पती संजीवच्या दुसऱ्या लग्नाबद्दल रेशमसुद्धा त्यावेळी खुश होती. इतकंच नव्हे तर रेशम आणि संजीव यांची दुसरी पत्नी लता सबरवाल यांच्यातही मैत्रीपूर्ण नातं आहे. तर दुसरीकडे रेशम गेल्या नऊ-दहा वर्षांपासून संदेश किर्तीकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय.
संजीवसोबत घटस्फोट जाहीर करताना लताने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘बऱ्याच काळापासून मौन बाळगलं होतं. अखेर मी जाहीर करते की मी माझ्या पतीपासून विभक्त झाली आहे. मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या शांतीचा आदर करा. याबद्दल कोणीही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका.’