सचिन तेंडुलकरने ‘धुरंधर 2’ पाहताच ‘जमील जमाली’ला केला फोन; थेट पाकिस्तानात सिक्स..

'धुरंधर : द रिव्हेंज' हा चित्रपट पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरने अभिनेते राकेश बेदी यांना फोन केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी याबद्दलचा खुलासा केला. फोनवर सचिन त्यांना नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

सचिन तेंडुलकरने धुरंधर 2 पाहताच जमील जमालीला केला फोन; थेट पाकिस्तानात सिक्स..
Sachin Tendulkar and Rakesh Bedi
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2026 | 11:08 AM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा एक असा चित्रपट आहे, जो तुम्ही पाहिला असो किंवा नसो.. मात्र त्याबाबत होणाऱ्या चर्चांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र ‘धुरंधर 2’ ची क्रेझ पहायला मिळतेय. हा चित्रपट, त्यातील भूमिका, कलाकार, गाणी, सीन्स.. अशा सर्वच गोष्टींबद्दल चर्चा होत आहे. अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही राहावलं नाही आणि त्यानेही रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील एक भूमिका सचिनला इतकी आवडली की त्याने थेट फोन करून अभिनेत्याचं कौतुक केलं. ही भूमिका दुसरी-तिसरी कोणती नसून राकेश बेदी यांनी साकारलेली जमील जमालीची आहे.

काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत राकेश बेदी यांनी सचिन तेंडुलकरच्या फोनचा हा किस्सा सांगितला. ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर अनेकांनी राकेश बेदी यांना फोन करून त्यांच्या दमदार अभिनयाचं कौतुक केलं. परंतु एका फोनने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. हा फोन होता सचिन तेंडुलकरचा. राकेश बेदी यांनी सांगितलं, “सचिन तेंडुलकरने चित्रपट पाहिल्यानंतर मला फोन केला होता. तो म्हणाला, राकेशजी.. मजा झाली, काय सिक्स मारलात तुम्ही! ते ऐकून मी सचिनला म्हणालो, होय.. तू सुद्धा खूप सिक्स मारले आहेत, परंतु तुझे सिक्स भारतात पडले आणि माझा सिक्स पाकिस्तानात पडला आहे.”

‘धुरंधर 2’ मध्ये राकेश बेदी यांनी पाकिस्तानी नेता जमील जमालीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेचा खरा चेहरा क्लायमॅक्समध्ये कळतो. जमील जमाली त्याचा जावई हमजा अली मजारीला सांगतो की तोसुद्धा त्याच्यासारखाच भारतीय गुप्तहेर आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि राकेश बेदी यांच्याशिवाय संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, दानिश इक्बाल, दानिश पंडोर, गौरव गेरा आणि सौम्या टंडन यांच्याही भूमिका आहेत. याआधी रजनीकांत, अल्लू अर्जुन, महेश बाबू, विजय देवरकोंडा यांसारख्या साऊथ सुपरस्टार्सनीही ‘धुरंधर 2’चं कौतुक केलं आहे.

‘धुरंधर 2’ने जगभरात तब्बल 1550 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शनिवारी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 25 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. प्रदर्शनाच्या 18 व्या दिवशीही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या कमाईच्या लाटेला घाबरून इतर अनेक चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

Follow Us