Saif Ali Khan: सैफला प्रत्येक दशकात मूल; करीनाने विचारलं, आता पुढचा प्लॅन काय? उत्तराची एकच चर्चा
Saif Ali Khan: कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी हजेरी लावली. यावेळी सैफने त्याच्या मुलांच्या शाळेतला गंमतीशीर किस्सा सांगितला.

Saif Ali Khan: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं सैफ अली खान आणि करीना कपूर खान त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. दोघांमधील मजेशीर संवाद, एकमेकांची खेचण्याची सवय आणि स्पष्टवक्तेपणा चाहत्यांना नेहमीच आवडतो. आता हे जोडपं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पाचव्या सिझनमध्ये एकत्र दिसणार असून, या शोचा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नेटफ्लिक्स इंडियावरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये एकत्र दिसले. या एपिसोडमध्ये सैफने गंमतीने सांगितलं की, 1991 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्याची पहिली पत्नी आणि सहअभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी लग्न झाल्यापासून त्याला प्रत्येक दशकात एक मूल झालं आहे.
“माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माझी चार मुले शाळेत होती. पहिली पालक-शिक्षक सभा (पीटीएम) झाली तेव्हा मी 20 वर्षांचा होतो, मग 30, आणि त्याच शाळेत नंतर 55 वर्षांचा झालो. शिक्षक बदलले, पण मी अजूनही तिथेच आहे,” असं सैफ हसत म्हणाला. इतकंच नव्हे तर त्याने हेही उघड केलं की, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी शाळेच्या एका कार्यक्रमात मंचावर सैफचा उल्लेख ‘माझा सर्वात जुना विद्यार्थी’ असा केला होता,” असा किस्सा त्याने सांगितला.
जेव्हा अर्चना पुरण सिंगने निदर्शनास आणून दिलं की सैफला प्रत्येक दशकात एक मूल झालं आहे, तेव्हा करीनाने त्याला गंमतीने विचारले, “आता तुझा काय प्लॅन आहे?” जेव्हा सैफने मस्करीत खांदे उडवले, तेव्हा ती पुढे म्हणाली, “पण माझ्यासोबत नाही!” तेव्हा सेटवर एकच हशा पिकतो. सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुलं आहेत. त्यानंतर 2004 मध्ये सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाला. 2009 मध्ये ‘टशन’ या अॅक्शन कॉमेडी चित्रपटाच्या सेटवर सैफ आणि करीना एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. सैफ आणि करीना यांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.
करीना कपूरने यापूर्वी एका मुलाखतीत सैफच्या पालकत्वाचं कौतुक केलं होतं. वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांचा सांभाळ करणं ही मोठी जबाबदारी असल्याचं तिने म्हटलं होतं. सैफ आपल्या सर्व मुलांना वेळ देतो, याचंही तिने कौतुक केलं होतं.
