Salman Khan: तिला तिच्या कुटुंबासोबत..; कतरिनाच्या बॉडी शेमिंगवर सलमान खान संतापला, ट्रोलर्सना सुनावलं

कतरिनाच्या बॉडी शेमिंगवर सलमानने घेतलेल्या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ‘बिग बॉस 20’च्या या एपिसोडमध्ये त्याने ट्रोलिंग, बॉडी शेमिंग आणि महिलांच्या प्रसूतीनंतरच्या शरीरावर केल्या जाणाऱ्या कमेंट्सचा मुद्दा ठामपणे मांडला.

Salman Khan: तिला तिच्या कुटुंबासोबत..; कतरिनाच्या बॉडी शेमिंगवर सलमान खान संतापला, ट्रोलर्सना सुनावलं
कतरिना कैफ, सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 20, 2026 | 8:40 AM

‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने सोशल मीडिया ट्रोलिंगवर संताप व्यक्त केला. सेलिब्रिटींच्या शरीरावर, वजनावर, दिसण्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर कमेंट करणाऱ्यांना सलमानने चांगलंच सुनावलं. याचदरम्यान त्याने अभिनेत्री कतरिना कैफचा थेट नाव न घेता बचाव केला. प्रेग्नन्सीनंतर कतरिनाच्या वाढलेल्या वजनावर झालेल्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर सलमानने महिलांना अशाप्रकारे ट्रोल करण्यावर प्रश्न उपस्थित केला. कतरिना कैफने नोव्हेंबर 2025 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर अलीकडेच ती अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात पती विकी कौशलसोबत दिसली होती. या सार्वजनिक उपस्थितीनंतर सोशल मीडियावर तिच्या लूक आणि वाढलेल्या वजनावर काही युजर्सनी कमेंट्स केल्या. तिच्या जुन्या आणि सध्याच्या फोटोंची तुलना करत काहींनी तिच्या शरीरावरही भाष्य केलं. या ट्रोलिंगवर सलमान खानने नाराजी व्यक्त केली.

सलमानने म्हटलं की, एखादी महिला प्रेग्नंट झाल्यानंतर तिचं वजन वाढणं ही सामान्य गोष्ट आहे. त्याने कतरिनाचा उल्लेख न करता सांगितलं की, जेव्हा ती पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी परत येईल, तेव्हा ती पुन्हा फिट होईल. सध्या तिला तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवू द्यायला हवा, असंही त्याने म्हटलं.

यावेळी सलमानने केवळ कतरिनाच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं नाही, तर सोशल मीडियावरील ट्रोलिंगच्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित केला. सेलिब्रिटींच्या शरीराचा आकार, वजन, दिसणं, कुटुंब, करिअरमधील अपयश किंवा मातृत्व अशा वैयक्तिक बाबींवर कमेंट करणं योग्य नसल्याचं त्याने सांगितलं. अशा प्रकारे दुसऱ्याला कमी लेखून पैसे कमावणाऱ्या ट्रोल्सवरही त्याने टीका केली. सलमान स्वतःही सोशल मीडिया ट्रोलिंगचा सामना करत असल्याचं यावेळी म्हणाला. त्याच्या वयावर आणि शरीरावर केल्या जाणाऱ्या कमेंट्सचा उल्लेख करत त्याने सांगितलं की, तो आता 60 वर्षांचा आहे आणि अनेक वर्षांपूर्वी जसा दिसत होता, तसाच कायम दिसणं शक्य नाही. याच मुद्द्यावर त्याने ट्रोलर्सना स्वत:बद्दलही विचार करण्याचा संदेश दिला.

कतरिनानेही अलीकडे प्रेग्नन्सीनंतर तिच्या शरीरात आणि त्वचेत झालेल्या बदलांबद्दल भाष्य केलं आहे. तिने सांगितलं की प्रसूतीनंतर तिची त्वचा अधिक संवेदनशील झाली आणि त्यामुळे तिला स्किनकेअर रूटीनमध्येही बदल करावे लागले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us