Salman Khan : सलमान खानच्या नावाने उभे राहणार आलिशान टॉवर्स, तब्बल 2500 कोटींचा मोठा प्रोजेक्ट
पंजाबमधील मोहाली येथे Jacob & Co. आणि GB Realty यांच्या भागीदारीत आलिशान निवासी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टमधील 2 टॉवर्सना सलमान खानचं नाव दिलं जाणार आहे. एकूणचं 2,500 कोटींची गुंतवणूक असल्याची माहिती आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांचं नाव आता केवळं चित्रपटांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्याच्या नावाशी जोडलेला एक मोठा रिअल इस्टेट प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहेत. पंजाबमधील मोहाली येथे आंतरराष्ट्रिय लक्झरी ब्रँड Jacob & Co. आणि स्थानिक बांधकाम कंपनी GB Realty यांच्या भागीदारीत आलिशान निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 2,400 ते 2,500 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातील दोन टॉवर्सना सलमान खानचं नाव दिलं जाणार आहे
9 एकर जागेवर उभाराल जाणार प्रकल्प
हा प्रकल्प मोहालीतील एअरपोर्ट रोड परिसरात सुमारे 9 एकर जागेवर विकसित केला जाणार आहे. या जागेची खरेदी स्थानिक प्राधिकरणाच्या लिलावातून जवळपास 550 कोटी रूपयांना करण्यात आली होती. या प्रकल्पाची रचना Jacob & Co. हा लक्झरी घड्याळं आणि दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड करणार आहे. तर बांधकाम आणि विकासाची जबाबदारी GB Reality सांभाळणार आहे. .या प्रकल्पात एकूण पाच निवासी टॉवर्स उभारण्याचा प्लॅन आहे. यापैकी दोन टॉवर्सना सलमान खानचं नाव देण्यात येणार आहे. तर उर्वरित 3 टॉवर्स Jacob & Co. या ब्रँडच्या नावाने ओळखले जाणार आहेत. पंजाबमधील हा पहिला ब्रँडेड रेसिडेन्सेस प्रोजेक्ट असल्याची माहिती आहे तर देशातील टियर – 2 शहरात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
काय असतं ब्रँडेड रेसिडेन्सेस?
ब्रँडेड रेसिडेन्सेस म्हणजे एखाद्या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाशी आणि डिझाइनशी जोडलेली आलिशान घरं. अशा प्रकल्पांमध्ये घरांच्या बांधकामासोबतच संबंधित ब्रँडची ओळख आणि रचना यांनाही महत्त्व दिलं जातं. त्यामुळे अशा घरांकडे प्रीमियम मालमत्ता म्हणून पाहिलं जातं.
सलमान खानने व्हिडिओ कॉलद्वारे लावली हजेरी
या प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित राहू शकला नाही. त्याने व्हिडिओव्दारे आपली उपस्थिती लावली आणि शुभेच्छाही दिल्या. या प्रकल्पात सलमानची नेमकी काय भूमिका आहे? तो गुंतवणूकदार आहे की त्याचं नाव फक्त ब्रँडिगसाठी वापरलं जाणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पुढील तीन वर्षात 5,000 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची योजना
GB Reality पुढील तीन वर्षांत 5000 कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.कंपनी उत्तर भारतात आपला लक्झरी निवासी व्यवसाय विस्तारू पाहत आहे. पुढील पाच वर्षांत एकूण गुंतवणूक अंदाजे 10,000 कोटी रूपयांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ब्रँडेड व्यवसाय प्रामुख्याने मुंबई, दिल्ली- एनसीआर आणि बंगळूरू यांसारख्या प्रमुख शहरांपुरता मर्यादित होता.पण आता याचा विस्तार उत्तर भारतातही होताना दिसत आहे.