Salman Khan: तुझ्याइतका नीच कोणीच नाही..; कोणावर भडकला सलमान खान?
Salman Khan: बिग बॉसच्या घरात मैत्री, प्रेम आणि स्पर्धा यांचं समीकरण सतत बदलत असतं. स्काऊट आणि लव्हच्या प्रकरणामुळे या नात्यांमधील मर्यादा आणि विश्वासाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Salman Khan: बिग बॉस 20 च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान पुन्हा एकदा स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. यावेळी त्याच्या निशाण्यावर आहे गेमर स्काऊट ओपी अर्थात तन्मय सिंग. लव्ह गिलसोबतच्या वाढत्या जवळिकीवरून आणि गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानीसमोर तिची बाजू न घेतल्यामुळे सलमानने स्काऊटला चांगलंच सुनावलं आहे. या प्रकरणामुळे बिग बॉसच्या घरातील मैत्री, प्रेम आणि नात्यांच्या मर्यादांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये सलमान स्काऊटला त्याच्या वागण्याबद्दल जाब विचारताना दिसतो. स्काऊट लव्हला आपली बहीणसमान मैत्रीण म्हणतो, मग गर्लफ्रेंड काश्वीसमोर तिची बाजू का घेतली नाही, असा सवाल सलमानने केला.
लव्हने तुला भावनिकरीत्या हाताळलं का, असं विचारल्यावर स्काऊटने नकार दिला. त्यावर सलमानने त्याला स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्ला दिला. दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी आपली चूक मान्य करायला हवी, असं त्याने स्पष्ट केलं. स्काऊटने लव्हला दिलेल्या नात्याच्या आश्वासनांवरही सलमानने प्रश्न उपस्थित केले. नात्याबाबत खोटं आश्वासन दिलं असेल, तर ते चुकीचं आहे, असं त्याने ठणकावून सांगितलं. सलमानच्या या वक्तव्यामुळे स्काऊटची चांगलीच अडचण झाल्याचं प्रोमोमध्ये दिसतं.
पहा व्हिडीओ-
लव्ह गिललाही सलमानने सुनावलं
स्काऊटच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित करताना सलमानने लव्ह गिललाही जाब विचारला. स्काऊटला गर्लफ्रेंड असल्याची माहिती असतानाही त्याच्यासोबत जवळीक का वाढवली, असा सवाल त्याने केला. या संपूर्ण प्रकरणात दोघांनीही आपल्या नात्याबाबत स्पष्ट भूमिका घ्यायला हवी, असं सलमानने सांगितलं. त्याने लव्हला विचारलं, “स्काऊटची गर्लफ्रेंड आहे हे तुला आधीच माहीत नव्हतं का? मग तुला कशावर स्पष्टीकरण हवं आहे? तू का रडत होतीस? जर पटवण्याच्या नादात खोटी कमिटमेंट दिली असेल तर तुमच्यापेक्षा नीच कोणताच पुरुष किंवा स्त्री नाही.”
स्काऊट आणि लव्ह यांच्यातील मैत्री सुरुवातीपासूनच चर्चेत होती. दोघंही एकमेकांना भाऊ-बहीणसमान मित्र म्हणत असले, तरी त्यांच्यातील जवळीक पाहून प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले होते. स्काऊट लव्हला मसाज करताना आणि तिच्यासोबत जवळीक साधताना दिसला होता. यामुळे सोशल मीडियावरही या दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं. यापूर्वीच्या ‘वीकेंड का वार’मध्ये स्काऊटची गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानी शोमध्ये आली होती. तिने स्काऊट आणि लव्हच्या नात्यावर नाराजी व्यक्त केली होती. लव्हने स्काऊटला आपल्या जाळ्यात अडकवल्याचा आरोपही तिने केला होता. मात्र, या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर काश्वीवरही टीका झाली.