मी सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

मराठी अभिनेता सौरभ गोखलेनं कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीच सरकारविरोधी भूमिका घेणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं आहे. या सर्व आंदोलनाची दुसरी बाजू काय आहे, यावर तो मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

मी सरकारविरोधी भूमिका घेणार नाही..; CJP आंदोलनावरून मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
सौरभ गोखले
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 22, 2026 | 10:21 AM

गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सुरू असलेल्या उपोषणाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर सोमवारी आंदोलकांच्या, विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. कॉकरोच जनता पार्टीचा हा मोर्चा सोमवारी थेट संसदेवर धडकला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या. या सर्वांची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र मराठमोळा अभिनेता सौरभ गोखलेनं याप्रकरणी सरकारचं समर्थन केलं आहे. मी कधीही सरकारविरोधी भूमिका घेणार नसल्याचं, सौरभने स्पष्ट केलंय.

काय म्हणाला सौरभ?

माध्यमांशी बोलताना सौरभ म्हणाला, “मी कधीच सरकारविरोधी भूमिका घेणार नाही. कारण प्रत्येक गोष्टीला सरकारच जबाबदार असतं, असं मला वाटत नाही. ज्या ज्या घटना घडल्या, त्याला वेगळी लोकं जबाबदार होती. त्या लोकांना अटकसुद्धा झाली आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात प्रशासन कुठेच कमी पडलेलं नाही. पण हे जे आंदोलन सुरू आहे, त्यात त्यांनी काही चांगल्या गोष्टीसुद्धा मांडल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या गोष्टी घडाव्यात, अशी त्यांची इच्छा आहे. पण त्याचसोबत अशाही काही गोष्टी घडल्या आहेत, ज्यामध्ये हिंदू धर्माबद्दल अत्यंत वाईट बोललं गेलंय. श्रीराम यांच्याबद्दल वाईट बोललं गेलंय. या सर्व गोष्टींना वेगळाच रंग दिला जातोय. हे कधीच धर्माभिमानी हिंदू व्यक्तीला पटणार नाही. मलाही हे पटत नाही.”

“शिक्षणव्यवस्थेसाठी तुम्ही उपोषण करत आहात, यामागील भावना मी समजू शकतो. पण त्यात कुठे तरी विचित्र गोष्टी यायला लागल्या आणि त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला की त्या सर्व गोष्टींकडे बघण्याचा आणि त्यांना फॉलो करण्याच्या इच्छेवरून मनच उठतं”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. दरम्यान अभिनेता सुबोध भावे, अतुल कुलकर्णी, रसिका सुनील, पूर्वा कौशल यांसारख्या सेलिब्रिटींनी सीजेपी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. सोशल मीडियावर या आंदोलनाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us