Sayaji Shinde : सह्याद्रीतील बेसुमार वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदें आक्रमक; ‘त्या’ कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
Sayaji Shinde : सह्याद्रीतील बेसुमार वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदें आक्रमक झाले आहेत.

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वीज प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीवर अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भीमाशंकर आणि तारळी येथील पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी गेल्या दोन वर्षांपासून डोंगर पोखरले जात असून, अतिदुर्मिळ झाडांची कत्तल केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या नसतानाही हे काम सुरू असल्याचा दावा सयाजी शिंदे यांनी केला आहे.
या प्रकरणी ‘अदानी ग्रीन एनर्जी’ कंपनीवर तातडीनं कठोर कारवाई करावी, तसंच कंपनीला काळ्या यादीत टाकून संबंधित प्रकल्प तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे.
‘एकही झाड न तोडता वीज प्रकल्प उभारा’
वीज निर्मितीला आपला विरोध नसून, त्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास केला जाऊ नये, असं सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. एकही झाड न तोडता आणि निसर्गाची हानी न करता वीज प्रकल्प उभारता येऊ शकतात. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून विकासकामं केली जावीत, अशी त्यांची मागणी आहे.
या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 3 तारखेला पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. झाडं आणि पुढील पिढीचं भविष्य वाचवण्यासाठी राज्यातील नागरिकांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि निसर्गप्रेमींनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
कंपनीविरोधात कायदेशीर नोटीसही बजावली
केवळ आंदोलनच नव्हे, तर या प्रकरणात कायदेशीर लढाईही सुरू करण्यात आली आहे. संबंधित कंपनीच्या दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी सयाजी शिंदे यांनी आपल्या वकिलांमार्फत जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला सार्वजनिक कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सह्याद्रीच्या जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी नागरिकांना या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.