तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर; कोर्टात थेट सांगितलं..
Tukaram Mundhe: आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएनं पाठवलेल्या नोटिशीला आता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी काय म्हटलंय, ते जाणून घ्या..

बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ सध्या ‘विमल’ इलायचीच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या तिन्ही कलाकारांना जाहिरातीसंदर्भात नोटीस बजावली होती. आता या नोटीसला तिन्ही अभिनेत्यांनी कायदेशीर उत्तर दिलं असून, त्यांचा करार पान मसाल्यासाठी नव्हे, तर फक्त माउथ फ्रेशनर म्हणजेच इलायचीच्या जाहिरातीसाठी होता, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीत शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ दिसतात. मात्र, एफडीएच्या मते या जाहिरातीमुळे विमल या ब्रँडचा संबंध पान मसाल्याशी जोडला जाऊ शकतो आणि त्यामुळे ही जाहिरात सरोगेट जाहिरात ठरते का, याची चौकशी करण्यात आली.
एफडीएने तिन्ही कलाकारांकडून जाहिरातीतील त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण तसंच करार, कॅम्पेन ब्रीफ, मानधन आणि इतर संबंधित कागदपत्रे मागितली होती. तिन्ही कलाकारांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान त्यांची बाजू मांडली. कलाकारांचा करार केवळ माउथ फ्रेशनर अर्थात इलायचीच्या जाहिरातीसाठी करण्यात आला होता. प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादनासाठी नव्हता, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे जाहिरात प्रत्यक्षात सरोगेट प्रमोशनच्या श्रेणीत येते का, याचा निर्णय आता एफडीएच्या तपासणीनंतर होणार आहे.
या प्रकरणात आतापर्यंत दोन औपचारिक सुनावण्या झाल्याची माहिती महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. एफडीए या जाहिरातीची मांडणी, ब्रँडशी असलेला संबंध आणि संबंधित कायदेशीर बाबींचा आढावा घेत आहे. महाराष्ट्रात तंबाखू किंवा निकोटीन असलेल्या गुटखा आणि पान मसाल्यांवर प्रतिबंध आहे. 2026 मध्येही या बंदीचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा उत्पादनांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष जाहिरातींकडे FDA विशेष लक्ष देत आहे.
एफडीएने यापूर्वी जाहिरात थांबवणं आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रमोशनल कंटेंट हटवण्यासह विविध बाबींबाबत कलाकारांकडून स्पष्टीकरण मागितलं होतं. मात्र, विमल इलायचीची जाहिरात सरोगेट जाहिरात आहे की स्वतंत्र माउथ फ्रेशनर उत्पादनाची जाहिरात आहे, हा मुद्दा अद्याप तपासाच्या प्रक्रियेत आहे.
सेलिब्रिटींनी जाहिराती करताना सजग राहावं, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही केलं होतं. मुर्मू यांनी 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपट कलाकारांना जाहीर आवाहन केलं होतं की, त्यांनी सार्वजनिक आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करू नये. खरा स्टार तोच असतो जो प्रकाश पसरवतो, अंधार नाही, असं त्या म्हणाल्या होत्या.