Larissa Bonesi : प्रसिद्ध अभिनेत्री आर्यन खानसोबत अडकणार लग्नबंधनात? ‘त्या’ वक्तव्यानं चर्चांना उधाण; शाहरुखबद्दल म्हणाली…
Actress On Aryan Khan : प्रसिद्ध अभिनेत्री आर्यन खान आणि खान कुटुंबाबद्दल भाष्य केलं असून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आर्यन खान आणि ब्राझिलियन मॉडेल-अभिनेत्री लारिसा बोनेसी यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र, अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच आता लारिसानं खान कुटुंबासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तसंच आर्यन आणि शाहरुख खान यांचंही कौतुक केलं आहे.
‘खान कुटुंब माझ्यासाठी कुटुंबासारखं’
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत लारिसा बोनेसीनं खान कुटुंबासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, ‘खान कुटुंब माझ्यासाठी कुटुंबासारखं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील यशाचा आदर करता, त्यांच्याकडून प्रेरणा घेता आणि माणूस म्हणून त्यांचा सन्मान करता, तेव्हा त्यांच्याशी एक वेगळंच नातं निर्माण होतं. त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मैत्री ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असून ती दीर्घकाळ टिकणारी असते.’ लारिसानं आर्यनसोबतच्या नात्याबद्दल थेट काहीही सांगितलं नसलं, तरी तिच्या वक्तव्यामुळे ती खान कुटुंबाच्या जवळ असल्याचं स्पष्ट होतं.
आर्यन खानचं केलं कौतुक
या मुलाखतीत लारिसानं आर्यन खानच्या स्वभावाचं आणि मेहनतीचंही कौतुक केलं. ती म्हणाली, ‘आर्यन खूप चांगला माणूस आहे. तो हुशार आणि मेहनती आहे. अनेकजण म्हणतात की त्याच्याकडे सगळंच आहे. मात्र, या गोष्टींचा त्याला फरक पडत नाही. त्याला स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करायची आहे. तो आपल्या भविष्याकरिता आणि ज्या गोष्टींवर त्याचा विश्वास आहे, त्यासाठी प्रयत्न करत आहे. तो नक्कीच यशस्वी होईल, कारण तो खूप मेहनती आणि आपल्या कामाबद्दल सिरीयस आहे.’
आर्यनच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची इच्छाही लारिसानं व्यक्त केली. आर्यनच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजच्या सेटवर मी एकदा गेले होते, असंही तिनं सांगितलं. त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्की आवडेल, असं ती म्हणाली.
लारिसा ही शाहरुख खानची मोठी चाहती आहे. मुलाखतीत तिनं शाहरुखचं कौतुक करताना म्हटलं, ‘ते किंग आहेत. ते एक दिग्गज कलाकार आहेत आणि कायम नंबर वन राहतील. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. केवळ प्रसिद्धी किंवा यश मिळवणं महत्त्वाचं नसतं, तर ते यश तुम्ही कसं मिळवलं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. ते असे व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडे तुम्ही आदर्श म्हणून पाहू शकता.’