मुस्लीम पुरुषाशी लग्नानंतर आयुष्य किती बदललं? मराठमोळ्या गायिकेनं स्पष्टच सांगितलं..
मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे एका मुलाखतीत तिच्या आंतरधर्मीय लग्नाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. शाल्मलीने फरहान शेखशी लग्न केलं आहे. लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाला, याविषयी तिने सांगितलं आहे.

प्रसिद्ध मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे हिने 2021 मध्ये मुस्लीम बॉयफ्रेंड फरहान शेखशी लग्न केलं. या आंतरधर्मीय लग्नाबद्दल त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. एका मुलाखतीत शाल्मली तिच्या लग्नाविषयी आणि आंतरधर्मीय लग्नाकडे पाहण्याच्या एकंदर दृष्टीकोनाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “आम्ही लग्नापूर्वी खूप बाजूंनी काही विचार केला नाही. आम्ही फक्त दोन बाजूंनी विचार केला, एक त्याच्या आणि एक माझ्या बाजूने. लग्न आमचं आहे आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांबद्दल आधी विचार करणं महत्त्वाचं आहे,” असं ती स्पष्ट म्हणाली.
कुटुंबीयांची प्रतिक्रिया कशी होती, याविषयी तिने पुढे सांगितलं, “आंतरधर्मीय लग्न करताना त्याच्या कुटुंबीयांना आणि माझ्या कुटुंबीयांना काही वेगळा विचार करावा लागला नाही. माझ्या आईवडिलांना एकच गोष्ट महत्त्वाची होती, ते म्हणजे .. माणूस कसा आहे? माणूस चांगला असणं आणि तो वेगवेगळ्या परिस्थितीत तुम्हाला कळतो, तो नेमका कसा आहे ते. तुम्ही बरे नसता, तेव्हा तो कसा असतो, तुम्ही प्रगती करता, तेव्हा तो कसा वागतो, तुम्ही जेव्हा खचलेले असता, तेव्हा तो कसा असतो, तुम्ही एकमेकांची काळजी कशी घेता? हे सर्व त्यांनी पाच वर्षे पाहिलं. हे सर्व असं आहे म्हणून त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, हे त्यांना नीट समजलं होतं. त्याच्यात धर्म येतच नाही कुठे.”
View this post on Instagram
मुस्लीम कुटुंबात लग्न केल्यानंतर आयुष्य कसं बदललं, काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलला, याविषयीही शाल्मलीने सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मला असं वाटतं की आयुष्याच्या चार गोष्टी मी त्याच्या धर्मातून शिकले आणि तो चार गोष्टी माझ्या धर्मामुळे शिकला आहे. माझ्यापेक्षा जास्त तो गणेशोत्सव अधिक उत्साहाने साजरा करतो. तो सगळीकडे दर्शनासाठी जातो आणि मी घरी बसलेली असते.”
यावेळी तिने एक किस्सासुद्धा सांगितला. “आम्ही मँगलोरहून ड्राइव्ह करून त्याच्या एका नातेवाईकाकडे चहासाठी गेलो होतो. त्याची मामी होती. आमचा ड्राइव्हर बाहेर होता. मामीने चहाचे चार कप आणले. चौथा कप त्यांनी ड्राइव्हरला आत बोलावून दिला. ते माहितीतले नव्हते, तरी आमच्यासोबत बसवून त्यांना चहा दिला. इस्लाममध्ये अशा काही छान गोष्टी आहेत.. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्यांची कदर करणं, उच्च-नीच वगैरे त्यांच्यात नाही. ते बघून मला खूप छान वाटलं की आपण एका अशा कुटुंबाचा भाग आहोत. सगळ्या धर्मात असं काही ना काही आहे, जे आपण घेऊ शकतो. आमच्यात असं आहे, तुमच्यात तसं आहे.. हे आम्ही दोघंही करत नाही,” असं शाल्मलीने स्पष्ट केलं.
