32 वर्षांपूर्वीच्या या मालिकेने गाजवलं होतं टीव्हीविश्व; 780 एपिसोड्स आणि अभिनेत्रीची हटके टिकली चर्चेत!
90 च्या दशकातील ‘शांति’ या सुपरहिट सीरिअलचे शेकडो एपिसोड आले आणि या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात घर केलं. मंदिरा बेदीच्या खास टिकलीने तर प्रचंड लोकप्रियता मिळवली.

90 च्या दशकाची गोष्टच काही न्यारी.. टीव्हीवर लागणाऱ्या मालिका या लोकांच्या रोजच्या जीवनाच्या भाग बनायच्या. दुपारी शाळेतून आल्यावर मुलं जेवणाची वाट बघायची, तर घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना आवडीच्या मालिका पहायच्या असायच्या. आजच्यासारखी भरमसाठ चॅनेल्स किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्स नव्हते. दूरदर्शनवर लागलेले कार्यक्रम , सगळं कुटुंबं एकत्र बसून पहायचे. याच सीरिअल्सपैकी एक अशी होती जिने तिची कहाणी आणि दमदार महिलेचे कॅरॅक्टर दाखवून, प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली. त्या मालिकेचं नाव म्हणजे – ‘शांति- एक घर की बुनियाद’.
पत्रकार बनून मंदिरा बेदीने अन्यायाविरोधात दिला लढा
1994 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत मंदिरा बेदीने ‘शांती’ नावाच्या तरुणीची भूमिका साकारली होती. शांती ही एक पत्रकार होती, जी सत्याचा शोध घेण्यासाठी आणि चुकीची कामं करणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी धाडस दाखवत असे. केवळ स्वतःचं करिअर घडवणं हे तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट नव्हतं, तर तिच्या आईसोबत झालेल्या अन्यायाचं सत्य तिला जगासमोर आणायचं होतं.
या मालिकेत शांतीचा सामना एका प्रभावशाली कुटुंबाशी होतो, ज्यांच्या भूतकाळात अनेक गुपितं दडलेली असतात. शांतीची आई तुलसी हिच्यासोबत जो गुन्हा घडलेला असतो, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी शांती अशा लोकांविरोधात उभी राहते, ज्यांच्याकडे सत्ता आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी असतात. या संघर्षात तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, मात्र ती माघार घेण्यास तयार नसते.
शांतीची टिकली आणि तिची स्टाइल बनली खास ओळख
त्या काळात टेलिव्हिजनवरील महिला व्यक्तिरेखा या प्रामुख्याने कौटुंबिक नात्यांभोवती फिरताना दिसायच्या. मात्र, शांतीची व्यक्तिरेखा त्यांच्यापेक्षा वेगळी होती. ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची असे आणि गरज पडल्यास प्रभावशाली लोकांनाही जाब विचारायची. अभिनेत्री मंदिरा बेदी हिने ही भूमिका ज्या आत्मविश्वासाने साकारली, त्यामुळे तिला घराघरांत ओळख मिळाली. तिच्या कपाळावरील बाणासारखी दिसणारी टिकली हादेखील शांतीच्या लूकचा एक खास भाग बनला होता. तिची ही स्टाइल इतकी लोकप्रिय झाली की, प्रेक्षकांसाठी मंदिरा बेदी यांना शांतीच्या भूमिकेपासून वेगळं करून बघणं, कठीण होतं. मालिकेच्या कथेत प्रत्येक वळणावर नवनवीन रहस्यं उलगडत होती, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम टिकून राहायची.
‘शांती’ ही मालिका त्या काळातील प्रेक्षकांसाठी केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हती, तर त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली होती. शाळेतून घरी परतणारी मुलं असोत किंवा घरातील कामं आवरणाऱ्या महिला, या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अनेकांच्या आजही लक्षात असेल. या मालिकेने कौटुंबिक नाती, अन्याय आणि महिला स्वावलंबन यांसारखे विषय मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडले होते. त्यामुळेच ‘शांती’ या मालिकेसला आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे.
