
अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. श्रद्धाच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असतेच. त्याचसोबत तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते आतुर असतात. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. पटकथालेखक राहुल मोदीला ती डेट करत असून हे दोघं लग्नाचा विचार करत असल्याचं म्हटलं गेलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी कोल्हापुरे यांना श्रद्धा कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्या हसल्या आणि म्हणाल्या, “खरंच का? मला त्याविषयी काहीच माहिती नाही, कसलीच कल्पना नाही.” यावेळी त्या श्रद्धाच्या अभिनयक्षेत्रातील कामाविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. “अर्थातच, ही खूप चांगली भावना आहे. मला वाटतं की प्रत्येकाने कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी योगदान दिलं आहे. पद्मिनी त्यात पहिली होती. पद्मिनीला ज्या प्रकारचं स्टारडम मिळालं, तो काळच वेगळा होता. त्याची तुलना आताच्या काळाशी करता येणार नाही. अर्थातच श्रद्धाने हा वारसा पुढे नेला आहे. ज्या प्रकारे कुटुंबाचं नाव पुढे नेलं जात आहे, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे”, असं त्या म्हणाल्या.
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा सर्वांत आधी 2024 मध्ये होत्या. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यालाही दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. 2024 मध्ये श्रद्धाने राहुलसोबत फोटोसुद्धा शेअर केला होता. नंतर बऱ्याच रिपोर्ट्समध्ये त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं गेलं. परंतु 2025 मध्ये पुन्हा त्यांना एकत्र पाहिलं गेलं. श्रद्धा किंवा राहुलने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी सोशल मीडियाद्वारे अनेकदा श्रद्धाने अप्रत्यक्षपणे तिचं प्रेम व्यक्त केलंय.
राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली. राहुलने याआधी ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलंय. राहुल हा श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचं कळतंय. त्याचं वय 35 वर्षे असून श्रद्धा कपूर ही 38 वर्षांची आहे.