श्रद्धा कपूर होणार मोदी कुटुंबाची सून? लग्नाबद्दलच्या प्रश्नावर अखेर सोडलं मौन
अभिनेत्री श्रद्धा कपूर लग्न कधी करणार, असा प्रश्न वारंवार चाहत्यांकडून विचारला जातो. आता खुद्द श्रद्धानेच एका चाहत्याला या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिच्या या उत्तराचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली श्रद्धा कपूर लग्न कधी करणार, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. श्रद्धाचं वय 38 वर्षे असून याआधी काही अभिनेत्यांसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत तिच्या रिलेशनशिपची सर्वाधिक चर्चा झाली होती. आदित्यसोबत तिने ‘आशिकी 2’मध्ये काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तर फरहानसोबत श्रद्धा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा होती. परंतु वडील शक्ती कपूर यांचा दोघांच्या नात्याला विरोध होता. त्यानंतर फोटोग्राफर रोहन श्रेष्ठासोबतही श्रद्धाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. अशातच ती सध्या पटकथालेखक राहुल मोदीला डेट करतेय. सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना तिने अखेर लग्नाबद्दलही मौन सोडलं आहे.
श्रद्धाने तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओ एकाने कमेंट करून विचारलं, “तू लग्न कधी करणार आहेस?” त्यावर श्रद्धाने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलंय. “मी करणार, लग्न करणार”, असं उत्तर श्रद्धाने संबंधित चाहत्याला प्रश्नावर दिलं आहे. त्यामुळे ती लवकरच बॉयफ्रेंड राहुल मोदीशी लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा सर्वांत आधी 2024 मध्ये होत्या. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यालाही दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. 2024 मध्ये श्रद्धाने राहुलसोबत फोटोसुद्धा शेअर केला होता. नंतर बऱ्याच रिपोर्ट्समध्ये त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं गेलं. परंतु 2025 मध्ये पुन्हा त्यांना एकत्र पाहिलं गेलं. श्रद्धा किंवा राहुलने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी सोशल मीडियाद्वारे अनेकदा श्रद्धाने अप्रत्यक्षपणे तिचं प्रेम व्यक्त केलंय.
कोण आहे राहुल मोदी?
राहुल मोदी हा पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली. राहुलने याआधी ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलंय. राहुल हा श्रद्धापेक्षा वयाने लहान असल्याचं कळतंय. त्याचं वय 35 वर्षे असून श्रद्धा कपूर ही 38 वर्षांची आहे.
