मी तिला सेझानसोबत रंगेहाथ पकडलंय, ते दोघं..; श्वेता तिवारीच्या पूर्व पतीचे गंभीर आरोप
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. 2000 मध्ये श्वेताने पलकला जन्म दिला. त्यानंतर त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचार, मद्यपान आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. 2007 पासून दोघं वेगळे राहू लागले होते. नंतर 2012 मध्ये ते कायदेशीररित्या विभक्त झाले.

अभिनेत्री श्वेता तिवारीचं खासगी आयुष्य हे खुल्या किताबाप्रमाणेच आहे. अभिनेता राजा चौधरीसोबतचं पहिलं लग्न, त्याच्यावर केलेले आरोप, घटस्फोट आणि त्यानंतर दुसऱ्या लग्नातील समस्या.. हे सर्व चाहत्यांना माहीत आहे. आता श्वेताचा पूर्व पती राजा चौधरी पुन्हा एकदा त्यांच्यातील भांडणांबद्दल व्यक्त झाला असून त्याने तिच्यावर नवे आरोप केले आहेत. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राजाने दावा केला आहे की, त्याने स्वत: श्वेताला ‘कसौटी जिंदगी की’मधील सहअभिनेता सेझान खानसोबत पाहिलं होतं. इतकंच नव्हे तर त्याने असाही आरोप केला आहे की, सेझानने फोनवरील संभाषणादरम्यान श्वेतासोबत संबंध असल्याची कबुली दिली होती. राजाच्या या आरोपांवर अद्याप श्वेताने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
मुलाखतीदरम्यान राजा म्हणाला, “श्वेताने मला दोन-तीन वेळा सांगितलं होतं की ती शूटिंगला जात आहे. पण जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा मला ती सेझानसोबत दिसली होती. हे मी स्वत: माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे हे सिद्ध झालंय. श्वेता अनेकदा मला ती कुठे आहे, याबद्दल चुकीची माहिती द्यायची. ती मला जाताना सांगायची की ती शूटिंगला जात आहे. पण त्याऐवजी ती दिल्लीतल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहायची. एकदा सेझानने मला स्वत:हून सांगितलं होतं की तो श्वेतासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तुझ्यात हिंमत असेल तर तू माझ्या घरी कोळीवाड्यात ये, अशी धमकी त्याने मला दिली होती.”
“सेझानने जाहीर कबुली दिली असली तरी श्वेताने कधीच त्याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं कबूल केलं नाही. मी सेझानला जाबही विचारला होता. यार, तू हे का करत आहेस? तू आमचं कुटुंब का उद्ध्वस्त करत आहेस, असा सवाल मी त्याला केला होता. त्यावर त्याने मला उत्तर दिलं होतं, कुठलं कुटुंब? ती तुझ्यासोबत कधीच नसते. तू फक्त तिचा बिनपगारी नोकर आहेस. तू जसा आहेस तसाच आनंदी राहा. श्वेताचं फक्त सेझानसोबतच नाही तर इतरही अभिनेत्यांसोबत अफेअर होतं. मला वाटतं, तिचं प्रत्येक व्यक्तीसोबत अफेअर होतं”, असे आरोप राजा चौधरीने केले आहेत.
फक्त भावनेच्या ओघात वाहून इतके गंभीर आरोप करणं योग्य नाही, असं जेव्हा सिद्धार्थने त्याला म्हटलं, तेव्हा तो पुढे म्हणाला, “त्यावेळी मी जे काही पाहिलं होतं, त्यावरून माझ्या आरोपांवर विश्वास ठेवण्यासारखं बरंच काही आहे. मी त्यावेळी जे पाहिलं, ते पूर्णपणे सिद्ध झालं. ती त्याच्यासोबत काम करत होती आणि तो त्याच्या घरी राहत होता. आमच्या एका कॉमन मित्रानेही कबूल केलंय की ती तिथे येऊन त्याच्यासोबत राहायची. मी आणखी कशावर विश्वास ठेवू?”