Raj Thackeray: देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण जेव्हा पाठीत बसेल ना तेव्हा…; राज ठाकरेंनी अमित शहांना सुनावलं, दिला सूचक इशारा
Raj Thackeray News: राज ठाकरेंनी आज कर्जतमध्ये सभा घेतली आहे. वृक्षतोडीवरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर घणाघाती टीका केली आहे.

भीमाशंकरच्या जंगलात मोठी वृक्षतोड सुरू आहे. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे आज वृक्षतोडीची माहिती घ्यायला कर्जतमध्ये गेले होते. यानंतर त्यांनी सभा घेतली आहे. त्यांनी भाषणातून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महायुती सरकारवर मोठी टीका केली आहे. राज ठाकरेंनी अमित शाहांना थेट इशारा दिला आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, इंटरनेट बंद केलं तरी सूर्य उगवायचा थांबतो का? इंटरनेट बंद केलं तरी या नेटवर्कचं काय करायचं? थोड्या वेळाने युट्यूबवर बघतील सगळे, कोणत्या जगात जगतात हे. मनात काळं असलं की अशा गोष्टी करायचं सुचतं. मन स्वच्छ असतं तर असं करायची सरकारवर वेळ आली नसती. तुटलेली झाडं पाहून वाटलं मी जंगलाच्या अंतिम संस्काराला आलो आहे. कोणत्यातरी गुजरात्यासाठी अख्ख जंगल छाटून टाकलं. भय्या नाही गुजराती, भलत्यालाच माराल, असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्कील टीका केली आहे.
ते म्हणाले की, या प्रकल्पाची काय गरज आहे मला सांगा. या सगळ्या गोष्टींच षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. आज जव्हार मोखाडाची लोक इकडे झाडे तोडायला येतात. आज इकडे येत आहेत. उद्या तुमच्या घरावर जंगलावर वरवंठा फिरेल याद राखा. महाराष्ट्रात टोरेंटो सारखे २३ प्रकल्प सह्याद्रीच्या कुशीत येत आहेत. ३ प्रकल्प केंद्राचे आहेत आणि बाकीचे २० अडाणी आणि इतरांचे आहेत. महाराष्ट्रात डेटा सेंटर येत आहेत. त्यासाठी पाणी लागणार. बाहेरची माणसं महाराष्ट्रात येणार, कॉलनी येणार त्यासाठी हे सगळं सुरु आहे, तुमच्यासाठी नाही.
राज ठाकरेंनी सांगितलं की, कोळशाचे प्रकल्प ४० येत आहेत. ज्यावरून वीजनिर्मिती होणार आहे. ४० वीजप्रकल्प येत आहेत, कोणासाठी आणत आहात? तुम्ही कमी कमी होणार बाकीचे वाढत जाणार आहेत. तुमचे मतदारसंघ फोडले जात आहेत. जगात काय चाललंय आणि आपल्या देशात काय चाललंय. आपल्या देशात तरुणांचं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला पुढे काय? सर्बिया देशात विद्यार्थ्यानी सत्ता पालटवून टाकली. ९७ पासून २०१२ पर्यंत झेनजी आहेत. झेनजी फक्त. दिल्ली ,मुंबई, पुण्यात नाहीयेत ग्रामीण भागातही आहेत ते कधी पेटून उठणार.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचं संपूर्ण विपणन खाजगी कंपनीकडे जाणार आहे. खाजगी कंपनी तुमचं भविष्य ठरवणार आहे. पुढे सगळं खासगी माणसाकडे दिलं जाणार, खाजगी माणसं म्हणजे कोण, तर मोदी आणि शहांचे मित्र. हा महाराष्ट्र खासगी लोकांच्या हातात द्यायचा आहे का, आज मला अमित शहांना एकच सांगायचं आहे की, कुऱ्हाडीचा आवाज येतो. देवाच्या काठीचा आवाज येत नाही. ज्या दिवशी पाठीत बसली ना. त्या दिवशी कळेल आपण कोणती कोणती पाप केली आहेत. कुठे घेऊन चाललोय महाराष्ट्र. पण महाराष्ट्रालाच चीड येत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
