Sharad Kapoor: ते भिकारी नाहीत, अशी थट्टा करू नका; शरद कपूर यांना एअरपोर्टवर पैसे देतानाचा व्हिडीओ चर्चेत
Sharad Kapoor: मुंबई एअरपोर्टवरच अभिनेता शरद कपूर यांना रोख रक्कम देत मदतीचा हात पुढे करण्यात आला. त्यांनीही ही मदत स्वीकारली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sharad Kapoor: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता शरद कपूर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण परिस्थितीमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडे काम आणि आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं होतं. आता सामाजिक कार्यकर्ता राहुल गुप्ताने शरद कपूर यांना मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई विमानतळावर दोघांची भेट झाली. यावेळी राहुल गुप्ता यांनी शरद कपूर यांना रोख रक्कम देत आर्थिक मदत केली. या भेटीचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, इतरांनीही अभिनेत्याच्या मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहन केलं आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
राहुल गुप्ताने केली आर्थिक मदत
राहुल गुप्ता हा एका कार्यक्रमासाठी मुंबईत आला होता. यावेळी विमानतळावर त्याची अभिनेता शरद कपूर यांच्याशी भेट झाली. शरद कपूर सध्या कठीण परिस्थितीतून जात असल्याचं समजल्यानंतर राहुलने त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने शरद यांना रोख रक्कम दिली. यासोबतच समाजातील इतर लोकांनीही अभिनेत्याच्या मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहन केलं. व्हिडीओमध्ये राहुल गुप्ता म्हणताना दिसतो की, ‘आज त्यांना मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही, तर माणुसकी कुठे आहे? त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन त्यांना मदत करावी.’ राहुलच्या या कृतीबद्दल शरद कपूर यांनी त्याचे आभार मानले. विशेष म्हणजे, वैयक्तिक ओळख नसतानाही त्यांनी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल शरद यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पहा व्हिडीओ-
शरद कपूर यांनी मागितलं होतं काम
काही दिवसांपूर्वी शरद कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांच्या चार पाळीव कुत्र्यांना प्राणी कल्याण केंद्रात हलवण्यात आलं होतं. यावेळी शरद भावूक झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांच्या प्रकृती आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा सुरू झाली. यानंतर ‘बेजुबान पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट’ने शरद कपूर यांचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्यांनी नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगितलं. तसंच चित्रपटसृष्टीतील लोकांनी आपल्याला काम द्यावं आणि आर्थिक मदत करावी, असं आवाहन केलं होतं. त्यांना पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे.
शरद कपूर यांच्या परिस्थितीची दखल घेत ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’नेही बॉलिवूडमधील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांना त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांना योग्य कामाची संधी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
कोण आहेत शरद कपूर?
शरद कपूर यांनी ‘दस्तक’ या चित्रपटातून विशेष ओळख मिळवली. या चित्रपटात सुष्मिता सेन यांचीही महत्त्वाची भूमिका होती. याशिवाय त्यांनी ‘जोश’, ‘तमन्ना’, ‘खौफ’, ‘जानी दुश्मन: एक अनोखी कहानी’, ‘एलओसी कारगिल’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.