
झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ताराची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची पिसाट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फेसबुकवर प्राचीला प्रसिद्ध अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी एक मेसेज केला होता. त्याच मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने चांगलीच शाळा घेतली आहे. ‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस’, असा मेसेज सुदेश यांच्या अकाऊंटवरून प्राचीला करण्यात आला आहे. त्याचाच स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने त्यांना चांगलंच सुनावलं आहे.
सुदेश यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने लिहिलं, ‘..आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली. बायकोचा नंबर असेलच, ती ही गोड आहे. बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का सुदेश म्हशीलकर.’ प्राचीला तिच्या फेसबुक मेसेंजरमध्ये 7 एप्रिल रोजी सुदेश यांचा आणखी एक मेसेज आला होता. त्याचाही स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. त्यात सुदेश यांनी म्हटलंय, ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली, वाह!’ या स्क्रीनशॉटवर प्राचीने म्हटलंय, ‘हो.. आणि खूप बोलायलाही लागलीये हल्ली. चुकीच्या मुलीशी पंगा घेतलाच काका. चुकलंच नाही का तुमचं?’
प्राचीने सुदेश यांच्याकडे जाहीर माफीची मागणी केली आहे. ‘चला आता विषय संपवुया. इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्से ही सांगू शकते’, अशा इशाराच तिने दिला आहे. सुदेश म्हशीलकर हे सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेत काम करत आहेत. सुदेश यांचं अकाऊंट कदाचित हॅक झालं असेल, अशी शक्यता काहींनी वर्तवली असता क्रॉस चेक केल्यावर हा कोणता हॅकर नसल्याचं तिने स्पष्ट केलंय.
तुझा गैरसमज झाला असावा. तो माणसू असा नाहीये, काहीतरी गफलत झाली आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. त्यावर प्राचीने लिहिलंय, ‘त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितलंय. बाय द वे हॅकर मराठी होता आणि अनेक महिने मुलींना मेसेज करत असेल. बरं झालं. माझ्या निमित्ताने कळलं तरी असे मेसेज करतोय. आणि हो हुशार पण होता. लगेच अनफ्रेंड केलं हॅकरने.’ प्राचीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.