Sushant Singh Rajput: त्याचा पाय मोडला होता, डोळ्याला दुखापत..; सुशांतच्या बहिणीचा धक्कादायक दावा

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत काही धक्कादायक दावे केले आहेत. श्वेताच्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सुशांतचं प्रकरण चर्चेत आलं आहे.

Sushant Singh Rajput: त्याचा पाय मोडला होता, डोळ्याला दुखापत..; सुशांतच्या बहिणीचा धक्कादायक दावा
सुशांत सिंह राजपूत आणि त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 28, 2026 | 11:06 AM

Sushant Singh Rajput: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला सहा वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी त्याच्या मृत्यूशी संबंधित प्रश्नांवरून चर्चा अद्याप सुरू आहे. आता सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमधून पोस्टमॉर्टमबाबत काही नवे दावे केले आहेत. पोस्टमॉर्टम करणाऱ्या व्यक्तीकडून तिला काही धक्कादायक माहिती मिळाल्याचं श्वेताने म्हटलं आहे. श्वेता सिंह कीर्तीने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं की, सुशांतच्या पोस्टमॉर्टमशी संबंधित व्यक्तीने त्याच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात बळाचा वापर झाल्याचं सांगितलं होतं. त्याच्या पायाला दुखापत झाली होती, डोळ्यांना इजा झाली होती आणि गनचा वापर झाल्याचाही दावा करण्यात आल्याचं श्वेताने सांगितलं.

सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील त्याच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. त्यावेळी या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांसह विविध केंद्रीय यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. 2020 मध्ये समोर आलेल्या अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुशांतच्या शरीरावर बाह्य दुखापती किंवा झटापटीच्या खुणा नसल्याचंही नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे श्वेताने आता केलेले दावे आणि यापूर्वी सार्वजनिक झालेल्या वैद्यकीय नोंदी यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणातील वेगवेगळ्या दाव्यांवर चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडीओमध्ये श्वेताने केवळ सुशांतच्या पोस्टमॉर्टमबाबतच भाष्य केलं नाही, तर चाहत्यांना भावनिक संदेशही दिला. सुशांतला गमावल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाची आठवण तिने करून दिली. मात्र, या सगळ्या परिस्थितीत आपल्या मनात द्वेष, सूड किंवा नकारात्मकता निर्माण होऊ नये, असं आवाहनही श्वेताने केलं. न्यायासाठी लढा, पण तो प्रेमाच्या भावनेतून असावा, सूडाच्या भावनेतून नाही, असा तिच्या संदेशाचा सूर होता. तिने लोकांना प्रेम, श्रद्धा आणि चांगुलपणावर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं. श्वेताच्या या नव्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर सुशांतबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी 2020 मध्ये बिहारमधील पाटणा इथं अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करून सुशांतच्या बहिणींनी त्याच्यासाठी बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणाचाही तपास सीबीआय करत होती. याप्रकरणी रिया चक्रवर्तीला क्लिन चिट मिळाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us